जातीय तेढ मिटवून समाजात समरसतेचा विचार रुजविण्यासाठी ८३ वर्षांपूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बदलापूरमधील शिवजयंती उत्सवाचे आमंत्रण स्वीकारून तेथील सोहळ्याचे अध्यक्षपदही भूषविले होते. विशेष म्हणजे यानिमित्त त्यांनी बदलापूरमध्ये एक दिवस मुक्कामही केला होता. या ऐतिहासिक घटनेची आठवण म्हणून येथील सोनिवली गावात नगरपालिकेच्या माध्यमातून एक भव्य स्मारक उभारले जात असून येत्या सात-आठ महिन्यांत त्यातील बौद्ध मंदिराचे काम पूर्ण होणार आहे. त्यामुळे पुढील वर्षी १४ एप्रिल रोजी येणारी डॉ. बाबासाहेबांची जयंती स्मारकस्थळी साजरी केली जाणार आहे.
३ मे १९२७ रोजी शिवजयंती उत्सवानिमित्त बदलापूर गावातील पांडुरंग भास्कर पालये शास्त्री यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना निमंत्रित करण्याची कल्पना मांडली आणि सर्व ग्रामस्थांनी त्यांना दुजोरा दिला. पालयेशास्त्रींनी व्यक्तिश: मुंबईला जाऊन डॉ. आंबेडकरांची भेट घेतली आणि त्यांना शिवजयंती उत्सवासाठी उपस्थित राहण्याची विनंती केली. जातीय सलोखा वाढीस लागण्याच्या दृष्टीने ही घटना महत्त्वपूर्ण ठरेल, हे ओळखून बाबासाहेबांनीही ते निमंत्रण स्वीकारले आणि त्यानिमित्त आयोजित समारंभाचे अध्यक्षस्थानही भूषविले. त्यानंतर पालयेशास्त्रींच्या घरी भोजन घेऊन त्यांनी मुक्कामही केला. बदलापूरसारख्या त्या वेळी अगदी छोटय़ा गावात घडलेली ही घटना राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीने मोठी आणि महत्त्वाची आहे. नव्या पिढीला या घटनेचे स्मरण व्हावे, या हेतूने सोनिवली गावात साडेतीन एकर जागेत सध्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक उभारले जात आहे. या स्मारकासाठी राज्य शासनाने साडेचार कोटी रुपये मंजूर केले असून जिल्हा प्रशासनानेही दोन कोटी रुपयांचा निधी दिला आहे.
अध्यात्म आणि ज्ञानरंजन केंद्र
बहुउद्देशीय स्वरूपाच्या या केंद्रात एक वाचनालय आणि दोन सभागृहे असतील. धार्मिक तसेच इतर कार्यक्रमांसाठी ही सभागृहे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. स्मारकाच्या मध्यभागी एक बौद्धमंदिर असून त्याचे काम येत्या एप्रिल महिन्यापर्यंत पूर्ण होईल. याशिवाय या स्मारकात बौद्ध भिक्खूंच्या निवासासाठी स्वतंत्र कक्ष असतील. थोडक्यात हे स्मारक अध्यात्म, ज्ञान आणि रंजनाचे केंद्र असणार आहे.
अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर ऐतिहासिक घटनेचे बदलापूरमध्ये स्मारक
जातीय तेढ मिटवून समाजात समरसतेचा विचार रुजविण्यासाठी ८३ वर्षांपूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बदलापूरमधील शिवजयंती उत्सवाचे आमंत्रण स्वीकारून
आणखी वाचा
First published on: 06-12-2013 at 06:57 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The chairman ambedkar historical event memorial in badlapur