कर्नाटकातील रामथळ-मारोल येथे साकारणाऱ्या सर्वात मोठय़ा एकात्मिक सूक्ष्म सिंचन प्रकल्प पूर्ण करण्याचे काम येथील जैन इरिगेशन सिस्टीम्सकडे देण्यात आले आहे.
कर्नाटक राज्याच्या जलसिंचन विभागाच्या कृष्णा भाग्य जल निगम लिमिटेडने राष्ट्रीय स्तरावरील निविदा या प्रकल्पासाठी आमंत्रित केल्या होत्या. त्यातून जैन इरिगेशन सिस्टीमची निवड करण्यात आली आहे. अपर कृष्णा प्रकल्पातील सर्व सिंचन प्रकल्पांचे नियोजन पाहणी, अंदाज अंमलबजावणी, कार्यान्वितता आणि देखभालीची सर्व जबाबदारी कृष्णा भाग्य जल निगमकडे आहे. ३८५ कोटी ७० लाख रुपये प्रकल्पातून साध्य होणार आहे. बागलकोट जिल्ह्य़ातील ३५ गावे या अंतर्गत पाणी बचत व कृषी क्रांतीचा वेध घेतील. तसेच ३० हजार ३८१ एकर क्षेत्र प्रकल्पामुळे सिंचनाखाली येऊन सात हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. रामथळ-मारोल प्रकल्प सूक्ष्म सिंचनाच्या कल्पनेवर आधारलेला आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यावर वाहिनीच्या मदतीने पाणी वाटप व सूक्ष्म पद्धतीचा वापर करून वापर करणारा हा देशातील सर्वात मोठा प्रकल्प ठरणार आहे.
एकीकडे पाण्याची तीव्र टंचाई आणि दुसरीकडे शेतांमध्ये गरजेपेक्षा पाण्याचा वापर होत असताना सूक्ष्म सिंचन प्रकल्प महत्त्वाची भूमिका निभावणार आहे. हिमाचल प्रदेशातील बल्हखोरे मध्यम प्रकल्प, कर्नाटकातील शिग्गाव, राजस्थानची इंदिरा गांधी नहार परियोजना, महाराष्ट्रातील पूर्णा मध्यम सिंचन प्रकल्प पूर्ण करण्याचा अनुभव कंपनीकडे असल्याचे व्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांनी सांगितले.

Story img Loader