मध्यमवर्ग अधिक उतावीळ झाला असून कृतघ्न बनला आहे. चळवळीपासून तो दूर गेला असून, त्यातूनच ‘माझे मी बघेन’ अशी प्रवृत्ती वाढत चालली असून, तो केवळ व्यक्तिवादीच नव्हेतर आत्महितवादी बनला आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी केले.
माजी केंद्रीय कृषिमंत्री डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या २०व्या स्मृतिदिनानिमित्त नगरपालिकेच्या वतीनेआयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानमालेत केतकर बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत अॅड. रावसाहेब शिंदे होते. या वेळी नगराध्यक्ष राजश्री ससाणे, उपनगराध्यक्ष संजय छल्लारे, माजी आमदार जयंत ससाणे, मुख्याधिकारी संतोष खांडेकर उपस्थित होते.
केतकर म्हणाले, मध्यमवर्गाच्या ऐहिक जीवनात १९९९ पासून वाढ झाली आहे. राजीव गांधी यांनी संगणक आणल्याने आज अमेरिकेत ३२ लाख भारतीय आहेत. पूर्वी दूरध्वनीसाठी खासदार व मंत्र्यांची चिठ्ठी लागत असे. पण आता ८० कोटी लोकांकडे मोबाइल फोन आला आहे. पूर्वी अन्नधान्याची टंचाई होती. १९७३ मध्ये सुकडी मिळविण्यासाठी नंबर लावावे लागत. दूध, साखर, रवा मिळावा म्हणून मोर्चे काढत. पण आता गॅस, पेट्रोलचे दर वाढले तरी मोटारींची विक्री कमी झालेली नाही. आता या वर्गाची जीवनशैली बदलली असून त्याच्यात आधुनिकता रुजली आहे. पूर्वी सर्वच राजकीय पक्ष तसेच अन्य संघटनांमध्ये हा वर्ग चळवळीत सक्रिय होता. आता मात्र समाजहिताच्या चळवळीत तो भाग घेत नाही. त्यामुळे हा वर्ग कुठलेही सरकार सत्तेत आले तरी त्यांच्याबद्दल तक्रारी सुरूच ठेवील. या वर्गात अस्वस्थता व उतावळेपणा वाढला आहे.
छल्लारे यांनी स्वागत केले. नगराध्यक्ष ससाणे यांनी प्रास्ताविक केले. नगरसेवक मुजफ्फर शेख यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी शिंदे यांचे भाषण झाले. मुख्याधिकारी खांडेकर यांनी आभार मानले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा