शालेय विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी स्कूलबसचा हा निर्णय स्वागतार्ह असला, तरी वाहतुकीची संपूर्ण जबाबदारी मुख्याध्यापकांवर टाकणे चुकीचे आहे, तसेच चंद्रपूरसारख्या छोटय़ा रस्त्यांच्या शहरात ऑटोसेवा बंद करण्याचा निर्णय अव्यवहार्य असल्याची प्रतिक्रिया मुख्याध्यापक, ऑटो चालक-मालक संघटना, पालक व संस्थाचालकांनी व्यक्त केली.
शहर कस्तुरबा गांधी व महात्मा गांधी या दोन प्रमुख रस्त्यांवर वसलेले आहे. या शहरातील रस्ते छोटे व मरणासन्न अवस्थेत आहेत.ऑटो चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र खांडेकर यांनी या निर्णयाचा विरोध करताना ऑटोत विद्यार्थी सुरक्षित शाळेत पोहोचविले जात असल्याचे सांगितले. बस ही ठरावीक थांब्यापर्यंत येत असून ऑटोवाला काका थेट घरापर्यंत येतो. विद्यार्थ्यांची ने-आण करताना संपूर्ण जबाबदारी ऑटोचालकावर असते. ऑटोचालक हा वेगावर नियंत्रण ठेवून वाहन चालवतो, परंतु बसचालकांचे तसे नाही. त्यामुळे ऑटो बंदीचा निर्णय हा शासनाने मागे घ्यावा, अशी मागणी खांडेकर यांनी केली. चांदा पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका भावना यांनी स्कूलबस हवी, हा निर्णय स्वागतार्ह असला, तरी वाहतुकीची संपूर्ण जबाबदारी मुख्याध्यापकांवर टाकणे चुकीचे असल्याचे सांगितले. तसेच ऑटो बंद करणे अव्यवहार्य असल्याचे सांगितले.स्कूलबसला लहान मुलांना त्यांच्या घरूनच घ्यावे लागते. काम करणाऱ्या पालकांना मुलांना बस थांब्यापर्यंत सोडणे व आणणे शक्य नाही. त्यामुळे स्कूलबसची सक्ती पूर्णपणे अव्यवहार्य आहे, असेही त्या म्हणाल्या. विद्यार्थ्यांचे पालक विनोद नालमवार, राधिका बाटवे, स्मिता रेभणकर यांनी स्कूलबस हवी, मात्र ऑटोरिक्षाही सुरूच हव्यात, अशी प्रतिक्रिया दिली. माऊंट कार्मेल, कार्मेल अकादमी या शाळांची स्वत:ची स्कूलबस नाही. त्यामुळे  विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी ऑटोच हवी. ऑटोचालक हा विद्यार्थ्यांची ने-आण करताना संपूर्ण काळजी घेतो, असे नालमवार यांनी सांगितले. दोन हजार विद्यार्थ्यांना स्कूलबसची सेवा देणे संस्था चालकांचा आर्थिक बोझा वाढविणारी आणि अशक्य बाब आहे. या शहरात तरी ऑटोरिक्षा सोयीस्कर असून स्कूलबसचा प्रयोग पूर्णत: यशस्वी होणार नाही, असे मत चांदा पब्लिक स्कूलच्या संचालिका स्मिता जीवतोडे यांनी व्यक्त केले.