बंदराच्या विकासात रोजगार, पायाभूत सुविधा, आयात-निर्यात, परकीय चलन वाढविण्याची क्षमता असल्याने राज्यात आणखी दोन-तीन बंदरांचा विकास करण्याचे केंद्र सरकाच्या विचाराधीन असल्याचे प्रतिपादन केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी वाशी येथील एका कार्यक्रमात केले. देशात एक नवीन वाहतूक व्यवस्था विकसित करताना जलवाहतुकीला प्राधान्य दिले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
बिल्डर असोसिएशन ऑफ नवी मुंबईच्या १५व्या मालमत्ता प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी गडकरी यांच्या हस्ते झाले. त्या वेळी त्यांनी देशातील वाहतूक समस्येवर उपाययोजना सांगितल्या. जगातील अनेक विकसित देशांबरोबर आपल्या देशाची स्पर्धा असून चीनमध्ये २० टक्के वाहतूक ही जलवाहतूक आहे. मात्र भारतात हे प्रमाण केवळ ०.५ टक्के आहे. त्यामुळे देशातील जलवाहतूक विकसित केली जाणार आहे. रस्ता आणि पाण्यावर चालणाऱ्या बस प्रायोगिक तत्त्वावर लवकरच मुंबईत आणली जाणार असून कॅटरमन, हावरक्रॉप्ट, सी प्लेन यांसारख्या जलवाहतुकीच्या साधनांना प्राधान्य दिले जाणार आहे. या वाहतुकींचा खर्च सर्वसामान्य भारतीयांना परवडता यावा यासाठी त्यांचे उत्पादन देशात सुरू करण्याचा भारत सरकारचा विचार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पेट्रोल, डिझेल यांना पर्याय म्हणून बायोगॅस, इथॉनॉल यांसारख्या इंधनाचा वापर करणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. सरकारने रस्ते सुरक्षेलाही महत्त्व दिले असून चार लाख करोड रुपयांची कामे सुरू झाली आहेत. मुंबई-गोवा रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण लक्षात घेता हा रस्ता सिमेंट क्राँक्रीटीकरणाचा करण्यात येणार असून बारा ठिकाणी उड्डाण पूल बांधण्याची कामे प्रगतिपथावर आहेत. देशाचा विकास दर ४.२ वर स्थिरावला आहे हा विकास दर कसा वाढेल याचा विचार सातत्याने केला जात असून विकास आणि पर्यावरण हे दोन्ही राखले जाणार आहे.
राज्यातील बस स्टेशनांचे बस पोर्टमध्ये रूपांतर करण्यासाठी आपण आजच राज्याचे परिवहनमंत्री व सचिव यांनी सांगितले असून हा विकास बडोद्याच्या बस पोर्टच्या धर्तीवर होणार आहे. त्यात विमानतळावरील सुविधा प्रवाशांना मिळणार आहेत. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा