उत्सवातील धिंगाण्याला शिस्तबद्ध वाद्यपथकाचा पर्याय ’ विचारी तरुणांचा पुढाकार
देखणे ध्वजपथक.. शिस्तबद्ध ढोलपथक.. शाळकरी मुलांचे लेझीम पथक.. मुलींचे झांजपथक अशा पुणेरी मिरवणूक पद्धतीचा अवलंब सध्या ठाणे जिल्ह्य़ातील गणेशोत्सवांमध्ये होऊ लागला आहे. डीजे, डॉल्बीचा कर्णकर्कश आवाज, मिरवणुकीतली धांगडधिंगाणी आणि विचित्र अंगविक्षेप करीत केल्या जाणाऱ्या नाचामुळे गणेशोत्सवाच्या उत्साहाला ओंगळतेचे गालबोट लागते. ते टाळून अतिशय शिस्तबद्ध आणि देखण्या पद्धतीने मिरवणूक काढण्यासाठी आता ठिकठिकाणचे तरुण पुढाकार घेऊ लागले आहेत.   
सामाजिक प्रबोधन आणि इंग्रजांविरोधातील आवाज बुलंद करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. मात्र स्वातंत्र्यानंतर हा उत्सव केवळ उथळ मनोरंजन आणि दिखाऊपणाचे माध्यम बनले. त्यामुळेच ध्वनिप्रदूषण, वाहतूक खोळंब्यासारखे नागरी प्रश्न निर्माण झाले आणि उत्सव त्रासदायक बनू लागला. त्यामुळेच या प्रकाराला कंटाळलेल्या शहरातील तरुणाईने या उत्सवाला विधायक स्वरूप देण्याचा प्रयत्न केला असून त्यासाठी पुण्याच्या उत्सव मिरवणुकीचा प्रयोग ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई तसेच अंबरनाथ-बदलापूरमध्येही सुरू केला आहे.
 कल्याणच्या सुशांत दीक्षित या तरुणाला शहरातील उत्सवाचे हे ओंगाळवाणे होत चालले स्वरूप खटकले. त्यावरून आपण या उत्सवामध्ये नवे काय करू शकतो याचा विचार त्याने केला आणि ढोलपथकाची संकल्पना त्याला सुचली. पुण्यातील शिवगर्जना या पथकामध्ये जाऊन त्याने ढोलपथकाचे प्रशिक्षण घेतले आणि त्याने कल्याणमध्ये शिवदुर्ग या ढोलपथकाची स्थापना केली. या पथकात १२५ युवक आणि ३० महिला असून दरवर्षी सहभागी होणाऱ्या तरुणांची संख्या वाढत आहे. सध्या हे पथक सुभेदारवाडा गणेशोत्सवाच्या मिरवणुकीबरोबरच इतरही मंडळांच्या मिरवणुकांमध्ये भाग घेते. केतन घोसाळकर यांचे ‘स्वराज्य’ हे ढोलपथक गेली चार वर्षे कल्याणमध्ये याच धर्तीवर कार्यरत आहे. ठाण्यातील काही मंडळे मिरवणुकीसाठी थेट पुण्याहून पथके आणून उत्सवाचा आनंद द्विगुणित करतात.
युवकांच्या या वाद्यपथकामध्ये शास्त्रोक्त पद्धतीने ढोल वाजवले जातात. त्यामुळे डॉल्बी, डीजेच्या तुलनेत यांच्या आवाजावर मर्यादा असते. शिवाय सादरीकरण कर्कश न होता कर्णमधुर होईल, याची दक्षता पथकातील तरुण घेतात. शिस्तबद्ध पथकामुळे गर्दीवर नियंत्रण राहते व हुल्लडबाजीला चाप बसतो. नववर्ष स्वागतयात्रेच्या निमित्ताने सुरू झालेली ही पथकांची परंपरा सध्या गणेशोत्सवाच्या मिरवणुकांमध्येही मोठय़ा प्रमाणात दिसू लागली आहेत. त्यांना लोकांचा मोठा प्रतिसादही मिळू लागला आहे. सध्या एकूण गणेशोत्सव मंडळांच्या तुलनेत या पथकांची संख्या कमी असली तरी प्रत्येक मंडळाने स्वत:चे असे पथक उभे करावे, असा त्यांचा प्रयत्न सुरू आहे, अशी माहिती मुंबईतील ढोलपथकाचे संस्थापक राजेशप्रभू साळगावकर यांनी ‘वृत्तान्त’शी बोलताना दिली.
डोंबिवलीमध्ये बडोदा, दख्खनी शैलीचे दर्शन
 डोंबिवलीतील टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या लेझीम पथकात यंदा बडोदा, दख्खनी आणि एशियाड प्रकारचे दर्शन घडणार आहे. नृत्यदिग्दर्शक विवेक ताम्हणकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे पथक सध्या सराव करीत आहे. दहीहंडी, हनुमान, कमळ आणि इंद्रधनुष्याचे कलात्मक प्रकार या पथकातील महिला पारसमणी चौकात करणार आहेत. या महिला पथकाला ढोल-ताशांचीही साथ दिली जाते. गेल्या एक महिन्यापासून हे पथक महिला समाजमंदिरामध्ये सराव करीत आहे. ५४ वर्षांच्या सुमती देसाई या सगळ्यात ज्येष्ठ, तर नववीमध्ये शिकणारी चैत्राली भावे ही सगळ्यात लहान मुलगी या पथकात आहे, अशी माहिती मंडळाचे संदीप वैद्य यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा