गोधनी परिसरात ५० कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या जलशुद्धीकरण केंद्राचे काम जवळपास पूर्ण होण्याच्या मार्गावर असून यामुळे फेब्रुवारीपर्यंत शहरात ११५ एमएलडी पाणी पुरवठा होणार असल्याची माहिती महापालिकेच्या जलप्रदाय विभागाचे सभापती सुधाकर कोहळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महापौर अनिल सोले यांच्या उपस्थितीत गोधनीतील जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी करण्यात आली. यावेळी जलप्रदाय समितीचे सभापती सुधाकर कोहळे, सत्तापक्ष नेते प्रवीण दटके, आरोग्य सभापती रमेश सिंगारे, बावने आणि गवरे उपस्थित होते.
गोधनी ते खैरी महादुला या भागात या २७. ४६ किलोमीटपर्यंत पाईप लाईन टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. ५ हेक्टरमध्ये हा प्रकल्प उभारण्यात आला.  त्यावेळी ३० कोटींचा हा प्रकल्प होता, मात्र कामाची संथ गती, आलेल्या अनेक तांत्रिक आणि जागेच्या संदर्भातील अडचणी बघता गेल्या दोन वर्षांत तो ५० कोटीवर गेला आहे. यात केंद्र सरकार १५ कोटी, राज्य सरकार ६ कोटी आणि महापालिका ९ कोटी खर्च करणार आहे. महापालिकेच्या वतीने हा खर्च वोवालिया कंपनी करणार आहे. २००९ मध्ये या कामाची निविदा काढण्यात आली असली तरी प्रत्यक्षात मात्र २०१० मध्ये कामाला प्रारंभ करण्यात आला. अडीच वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करायचा असताना जवळपास ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. विजेसाठी निविदा भरली असून पैसा देण्यात आला आहे. त्यामुळे वीज मंडळाकडून लवकर काम सुरू होईल. या प्रकल्पामुळे फेब्रुवारीपर्यंत शहरात पश्चिम, दक्षिण पश्चिम, मध्य आणि दक्षिण नागपुरातील विविध वस्त्यांना त्याचा फायदा होणार आहे. या भागातील अनेक वस्त्यांमध्ये पाण्याची समस्या असताना या प्रकल्पामुळे ती दूर होईल, असेही कोहळे म्हणाले.

Story img Loader