अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलेली मदत तोकडी आहे, अशी स्पष्ट कबुली देत मुख्यमंत्र्यांनी ही मदत केंद्र शासनाच्या सहकार्याने वाढवून देण्याचा प्रयत्न होत आहे, अशी माहिती दिली. जिल्हा भाजपच्या नेत्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बेमुदत उपोषण केले होते. त्यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार देवेंद्र फ डणवीस यांच्या माध्यमातून हे उपोषण सोडवितांना खास भेटीचे आयोजन करीत चर्चा करण्याची हमी मुख्यमंत्र्यांनी दिली होती. त्यानुसार आज दुपारी विधानभवनात या भेटीचे आयोजन करण्यात आले होते. विरोधी पक्षनेते विनोद तावडे व प्रदेशाध्यक्ष आमदार देवेंद्र फ डणवीस यांच्या नेतृत्वाखाली माजी खासदार सुरेश वाघमारे, रामदास तडस, आमदार दादाराव केचे, आमदार रणजित पाटील, अविनाश देव, राणा रणनवरे, सुनील गफोट या नेत्यांनी मुख्यमंत्री चव्हाण यांच्याशी चर्चा केली.     
या जिल्ह्य़ातील अतिवृष्टीनंतर स्थानिक प्रशासनाने हलगर्जीपणा केला होता. शासनाने अपुरी मदत दिली. त्यामुळेच उपोषण करण्याची वेळ आल्याचे स्पष्ट करून भाजप नेत्यांनी दुष्काळातील जनावरांना जगविण्यासाठी १७०० कोटी रुपये खर्च होतात, तर विदर्भातील माणसे जगविण्यासाठी सरकार खर्च का करीत नाही, असा प्रश्न उपस्थित केला. विदर्भातील माणसांना जनावरांपेक्षा कमी किंमत सरकार देते का, असा सवाल रामदास तडस यांनी विचारला. तासभर चाललेल्या या चर्चेत शेवटी मुख्यमंत्र्यांनी अतिवृष्टीचे सर्वेक्षण मानवतेच्या दृष्टिकोणातून करून वाढीव मदत देण्याचे मान्य केले. सर्वेक्षणात होणाऱ्या चुका टाळल्या जातील.
संरक्षण भिंतीवर प्राधान्याने खर्च करून प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याचे प्रयत्न यापुढे होतील. जिल्हा मध्यवर्ती बंॅकेच्या समस्यांचा आढावा घेऊन शेतकऱ्यांना व ठेवीदारांना दिलासा देण्याचा तातडीने प्रयत्न होईल, असेही आश्वासन मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळास दिले, अशी माहिती भाजपचे कार्यालय सचिव मुकुंद कुळकर्णी यांनी दिली.

Story img Loader