लोकल गाडीचा फुटबोर्ड आणि फलाट यांच्यातील उंची यांच्यातील तफावत प्रवाशांच्या जीवावर बेतत असल्याचे अनेकदा समोर येऊनही आतापर्यंत कोणतीही कारवाई न करणाऱ्या रेल्वे प्रशासनाने थेट कमिशनर ऑफ रेल्वे सेफ्टीकडे याबाबत प्रस्ताव पाठवला आहे. ही पोकळी कमी करण्यासाठी रूळ आणि फलाट यांच्यातील उंची कमी करण्यात यावी, असा प्रस्ताव पश्चिम रेल्वे प्रशासनाने पाठवला आहे. ‘लोकसत्ता’ने जुलै महिन्यात केलेल्या पाहणीत पश्चिम रेल्वेमार्गावरील स्थानकांवर हे अंतर जीवघेणे असल्याचे लक्षात आले होते.
फलाट आणि गाडी यांच्यातील उंची जास्तीत जास्त ३५.५ सेंटीमीटर म्हणजेच १ फूट दोन इंच एवढी असावी, असा रेल्वेचा नियम आहे. फलाट आणि रूळ यांच्यातील अंतर हे ८४० मि.मी. एवढे असावे लागते. तर रूळ आणि लोकल गाडीचा यांच्यातील अंतर ११२० मि.मी. तर फलाट आणि लोकल गाडीचा फुटबोर्ड यांच्यातील अंतर २८० मिमी एवढे असणे अपेक्षित आहे. मात्र अनेकदा हे अंतरही जीवघेणे ठरत असल्याचे दिसून आले होते.
पश्चिम रेल्वेवर मध्यंतरीच्या काळात ग्रँटरोड, माटुंगा रोड, चर्निरोड या स्थानकांवर फलाट आणि गाडी यांच्यातील उंची १ फूट ८ इंच एवढी जास्त असल्याचे आढळले होते. त्यानंतर पश्चिम रेल्वेने ग्रँटरोड स्थानकावर तातडीने काम सुरू करत ही उंची कमी केली. मात्र आता पश्चिम रेल्वेने कमिशनर ऑफ रेल्वे सेफ्टीकडे रूळ आणि प्लॅटफॉर्म यांच्यातील किमान उंची वाढवण्याचा प्रस्ताव पाठवला आहे. ही उंची ९२० मिमी एवढी केल्यास फलाट आणि गाडीचा फुटबोर्ड यांच्यात फक्त २०० मि.मी. म्हणजे २० सेंटीमीटर एवढीच पोकळी उरेल. त्यामुळे प्रवाशांना चढणे उतरणे सहज शक्य होईल, असे पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक हेमंतकुमार यांनी सांगितले. मात्र हा प्रस्ताव कमिशनर ऑफ रेल्वे सेफ्टीकडून चीफ कमिशनर ऑफ रेल्वे सेफ्टी आणि नंतर रेल्वे बोर्डाकडे जाईल. रेल्वे बोर्डाने मान्यता दिल्यानंतरच याबाबत कार्यवाही करण्यात येईल, असे हेमंतकुमार यांनी स्पष्ट केले.
मध्य रेल्वे मार्गावर ठाण्यात फलाटाची उंची वाढवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्याचबरोबर डोंबिवली, मुलुंड, घाटकोपर, दादर या ठिकाणी कमी उंचीच्या फलाटांची उंची वाढवण्याचे काम येत्या दीड महिन्यात हाती घेण्यात येणार आहे. लवकरच ते काम पूर्ण होईल, असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
लोकलचा ‘गारेगार’ प्रवास अद्यापही दूर!
घरातून ताजेतवाने होऊन दररोज आपले कार्यालय गाठण्यासाठी रेल्वेप्रवास करणाऱ्या मुंबईकरांचा अवतार चर्चगेट, दादर किंवा मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसला पोहोचेपर्यंत पाहण्यासारखा असतो. रेल्वेतील गर्दीमुळे आणि मुंबईच्या उकाडय़ामुळे लोकलप्रवासात घामाच्या धारांची वेगळी आंघोळ घडते. हे चित्र पालटण्यासाठी मुंबईच्या उपनगरीय सेवेत वातानुकुलित लोकल गाडी धावणार असल्याची चर्चा गेले अनेक दिवस सुरू आहे. मात्र ही गाडी पुढील वर्षी जून किंवा जुलैपर्यंत प्रायोगिक तत्त्वावर चाचणी स्वरूपातही धावण्याची शक्यता नसल्याचे पश्चिम रेल्वेचे महासंचालक हेमंत कुमार यांनी स्पष्ट केले.
‘दीड फुटांची जीवघेणी पोकळी’ कमी होणार
लोकल गाडीचा फुटबोर्ड आणि फलाट यांच्यातील उंची यांच्यातील तफावत प्रवाशांच्या जीवावर बेतत असल्याचे अनेकदा समोर येऊनही आतापर्यंत कोणतीही कारवाई न
First published on: 30-11-2013 at 06:38 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The gap between platform and train will decrease soon