सलग चौथ्यांदा विजयी झाल्यामुळे मंत्रिपदाच्या बाबतीत निश्चिंत असलेले भाजपचे खासदार हंसराज अहीर यांना आज अखेरच्या क्षणी धक्का बसला.
मंत्रिमंडळाच्या यादीत त्यांचे नाव नाही हे बघून मोठय़ा संख्येत दिल्लीत दाखल झालेल्या त्यांच्या समर्थकांमध्ये निराशा पसरली. आता जूनमध्ये होणऱ्या विस्तारात त्यांना स्थान मिळेल असा दावा अहिरांच्या वर्तुळातून करण्यात येत आहे. सलग चौथ्यांदा भाजपच्या तिकिटावर येथून निवडून आलेले हंसराज अहीर निकालाच्या दिवसापासूनच मंत्रिपदाविषयी निश्चिंत होते. यावेळी मतदारांमध्ये असलेल्या मोदी लाटेमुळे ते २ लाख ३६ हजारांच्या फरकाने विजयी झाले. अहीर यांची लोकसभेतील कामगिरीसुद्धा प्रभावी राहिली आहे. प्रदेश भाजपच्या वतीने दिल्लीतील पक्षश्रेष्ठींना मंत्रिपदासाठी देण्यात आलेल्या यादीत अहीर यांचे नाव होते. स्वत: नितीन गडकरी यांनी त्यांच्या नावाचा आग्रह धरला होता. त्यामुळे अहीर मंत्रिपदाची आशा बाळगून होते. रविवारी येथून दिल्लीला रवाना होताना त्यांच्यासोबत त्यांचे सुमारे ४० समर्थक सुद्धा गेले होते. प्रत्यक्षात आज सकाळी त्यांना राष्ट्रपती भवनातून दूरध्वनी आलाच नाही.
महाराष्ट्रातून कुणाला मंत्री करायचे यावर विचार सुरू असताना अखेरच्या क्षणी पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांचे नाव समोर आल्याने अहिरांचे नाव मागे पडले अशी माहिती आता समोर येत आहे. मंत्रिमंडळाचे गठन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक निकष लावले होते. या सर्व निकषात अहीर बसत होते. गेल्या कार्यकाळात अहीर यांनी देशभर गाजलेला कोळसा घोटाळा बाहेर काढण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
त्यामुळे त्यांना कोळसा खात्याचे मंत्रीपद मिळेल, अशी अपेक्षा त्यांचे समर्थक बाळगून होते. प्रत्यक्षात त्यांना अखेरच्या क्षणी संधी नाकारण्यात आल्याने त्यांच्या समर्थकांचा हिरमोड झाला आहे. अहीर यांच्यासोबतच जालनाचे खासदार रावसाहेब दानवे यांचे नाव चर्चेत होते. दानवे सुद्धा चौथ्यांदा निवडून आले आहेत. त्यांना मात्र आज संधी मिळाली. दानवे व गोपीनाथ मुंडे मंत्री झाल्याने मोदींच्या मंत्रिमंडळात मराठवाडय़ाला दोन मंत्री मिळाले आहेत.
विदर्भात मात्र केवळ नितीन गडकरी यांना संधी मिळाली. आता अहिरांचा क्रमांक केव्हा? असा प्रश्न भाजपच्या वर्तुळात उपस्थित केला जात आहे.
आजच्या घडामोडींमुळे अहीर समर्थक नाराज झाले असले तरी त्यांनी आशा सोडलेली नाही. येत्या ६ जूनला मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून त्यात अहीर यांना नक्की संधी मिळणार आहे, असा दावा त्यांच्या समर्थकांनी आज दिल्लीतून बोलताना केला. पक्षाच्या नेत्यांनी अहिरांना तसे आश्वासन दिले आहे, असे या समर्थकांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता येथील भाजपच्या नेत्यांचे लक्ष ६ जूनकडे लागले आहे. आज मंत्रीपद मिळेल या आशेने अहिरांच्या येथील समर्थकांनी तसेच भाजपच्या कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा करण्यासाठी मोठी तयारी करून ठेवली होती. त्यावरही आता विरजण पडले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा