माणसाची प्रज्ञा तंत्रज्ञानामुळे हरवत चालली आहे. महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्याप्रमाणे प्रज्ञा जागृत ठेवली पाहिजे, असे प्रतिपादन औरंगाबाद येथील पुरोगामी विचारवंत शांताराम पंदेरे यांनी केले. आक्रमण युवक संघटनेने बुधवारी भीमा कोरेगाव क्रांतिदिन रॅलीचे आयोजन केले होते. यावेळी पंदेरे बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत संकल्प डांगे होते. यावेळी नागपूर विद्यापीठाच्या माजी संस्कृत प्रमुख डॉ. रूपा कुळकर्णी, आक्रमणचे प्रमुख संघटक अ‍ॅड. सुनील गजभिये, बानाईचे अध्यक्ष पी.एस. खोब्रागडे, नवयान ग्रंथाचे लेखक मिलिंद कीर्ती, आदी उपस्थित होते. या कार्यक्रमापूर्वी हिंगणा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून क्रांतिदिन मोटारसायकल रॅली काढण्यात आली. कार्यक्रमात बुद्धिस्ट संडे शाळेच्यावतीने भीमक्रांती गीते सादर करण्यात आली. तसेच सिंहनाद संस्थेने ‘जयभीम’ ही एकांकिका, त्यानंतर ‘आंबेडकरी जलसा’ हा कार्यक्रम सादर करण्यात आला.

Story img Loader