लोकसभा निवडणुकीत सर्वच नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा आणि मतदानाच्या टक्केवारीत वाढ व्हावी, या उद्देशाने ठाणे महापालिका शहरात जनजागृती मोहीम राबविणार असून त्यासाठी निरनिराळ्या भागांत चित्ररथाद्वारे ‘मतदान करा’ असा संदेश देण्यात येणार आहे. त्याचबरोबर चौका-चौकांमध्ये मतदानाविषयी जनजागृती करणारी पथनाटय़ेही सादर करण्यात येणार आहेत. आपले मत, आपली ताकद, अशा आशयाचे फलकही शहरात लावण्यात येणार असून ठाणे परिवहन सेवेच्या बसगाडय़ांवरही अशा प्रकारचे फलक लावण्यात येणार आहेत.
कळवा आणि मुंब्रा पोटनिवडणुकीतील मतदानाची टक्केवारी फारशी समाधानकारक नव्हती. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत प्रत्येक नागरिकाने मतदानाचा हक्क बजावून मतदानाच्या टक्केवारीत वाढ करावी, यासाठी निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदानाविषयी जनजागृती करण्यासाठी मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी होर्डिग्ज, पोस्टर्स, बॅनर्स लावण्यात येणार असून त्या माध्यमातून मतदारांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे, अशी माहिती ठाणे महापालिका आयुक्त असीम गुप्ता यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. ‘जर करणार नाही मतदान, तर होईल खूप नुकसान’, अशा आशायाचे मोठमोठे फलक शहरात लावण्यात येणार आहेत. त्याचबरोबर ठाणे परिवहन सेवेच्या सुमारे ४० बस गाडय़ांच्या मागील बाजूस मतदारांमध्ये जागृती होईल, अशा स्वरूपाचे फलक लावण्यात येणार आहेत. तसेच बस गाडय़ांच्या सीटजवळही स्टीकर लावून जनजागृती करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले. ठाणे महापालिकेने ‘मतदान करा’ असा संदेश देण्यासाठी चित्ररथ तयार केला असून हा चित्ररथ येत्या बुधवारपासून शहरभर फिरणार आहे. त्याच्यासोबत पथनाटय़ाचे प्रयोगही सादर करण्यात येणार आहेत. तसेच गुढीपाडव्याच्या स्वागत यात्रेमध्येही हा चित्ररथ सहभागी होईल, अशी माहितीही त्यांनी दिली. तसेच महाविद्यालयातील तरुणांमध्येही मतदानाविषयी जागृती निर्माण करण्यासंबंधी कार्यक्रम राबविण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
घरोघरी पालिका
पावती देणार..
आपल्या उमेदवाराला मतदान करावे, यासाठी मतदार यादीतील क्रमांक आणि मतदानाचे ठिकाण असलेल्या पावत्या सर्वच राजकीय पक्षांकडून नागरिकांना देण्यात येतात. पण नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावावा, यासाठी महापालिकेमार्फत अशा पावत्या घरोघरी जाऊन देण्यात येणार आहेत.घोषवाक्यांद्वारे जागृती
मतदार यादीत नाव लिहू या, मतदार पत्र सगळे घेऊ या.!, बुथवर जाऊन मतदान करा, लोकशाहीचा आनंद साजरा करा, मत देण्याचा आपला अधिकार बदल्यात होऊ नका कोणाचे शिकार, राष्ट्राची प्रगती जो करील त्यालाच आम्ही मतदान करू, आपले मत आहे अनमोल, कधीच होणार नाही याचे मोल, अशी घोषवाक्ये महापालिकेमार्फत तयार करण्यात आली असून त्याद्वारे मतदारांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा