तालुक्यातील घोटीजवळ शुक्रवारी मंगला एक्स्प्रेसला अपघात झाल्यानंतर सामाजिक बांधीलकीतून आपले सर्व काम बाजूला सारून मदतीला धावलेल्या घोटीतील मित्र मंडळांच्या कार्यकर्त्यांची रेल्वे प्रशासनाने साधी विचारपूसही न केल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
घोटीजवळील प्रचितराय मंदिराजवळ शुक्रवारी सकाळी मंगला एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरल्यानंतर सर्वप्रथम या अपघाताचे गांभीर्य लक्षात घेत घोटीतील विविध मंडळांचे कार्यकर्ते घटनास्थळी धावले. युवकांनी स्वयंस्फूर्तीने मदत कार्यात झोकून दिले. रेल्वेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांची वाट न पहाता कार्यकर्त्यांनी जखमी प्रवाशांना सुखरूप बाहेर काढत त्यांना स्वखर्चाने जवळील रुग्णालयांमध्ये दाखल केले. गावातील कार्यकर्त्यांना घोटी टोलनाक्यावरील युवा कर्मचाऱ्यांनीही चांगली साथ दिली. घटनास्थळी अनेक डबे एकमेकांवर चढल्याने डब्यांचे पत्रे कापले गेले होते. त्यामुळे डब्यांमध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढतांना कापलेल्या पत्र्यांमुळे स्वत: जखमी होण्याचा धोका असतानाही कार्यकर्त्यांनी त्याची तमा न बाळगता मदतकार्य सुरूच ठेवले. कुलदीप चौधरी यांनी अपघात झाल्याचे कळताच आपल्या महाविद्यालयाच्या सर्व गाडय़ा प्रवाशांना इगतपुरी रेल्वे स्थानकापर्यंत नेण्यासाठी उपलब्ध करून दिल्या. घटनास्थळापासून जवळच निवास असणाऱ्यांनी या प्रवाशांना आपल्या घरातील सदस्य समजून त्यांच्या चहा, नाश्त्याची सोय केली.जिल्हा परिषदेच्या अर्थ आणि बांधकाम समितीचे सभापती अलका जाधव यांच्यासह त्यांचे पती उदय जाधव यांनी आपल्या नातलगाच्या दशक्रिया विधीचा कार्यक्रम अर्धवट टाकून घटनास्थळी धाव घेत प्रवाशांना मदत केली. जवळपास घोटीसह परिसरातील सर्वच ग्रामस्थांनी जमेल त्याप्रमाणे प्रवाशांना मदत केली. असे असताना रेल्वे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मदत करणाऱ्यांची साधी विचारपूसही न केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळी मदत करणाऱ्या युवकांना रेल्वे पोलिसांनी हिसका दाखवीत पिटाळण्याचे काम केले. रेल्वे अधिकारी व कर्मचारी आणि पोलिसांची ही वृत्ती घोटीकरांसाठी चीड आणणारी ठरली आहे.
अपघातस्थळी मदत करणारे रेल्वेकडून बेदखल
तालुक्यातील घोटीजवळ शुक्रवारी मंगला एक्स्प्रेसला अपघात झाल्यानंतर सामाजिक बांधीलकीतून आपले सर्व काम बाजूला सारून मदतीला धावलेल्या
First published on: 19-11-2013 at 07:11 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The people helped on accident site dislodge by railway