एखाद्या संघटनेचा झेंडा खांद्यावर घेऊन आपली बाजू मांडणाऱ्या विद्यार्थ्यांनी काही नैतिकतेचे व तत्त्वांचे भान राखले पाहिजे.. हिंदुजा महाविद्यालयाच्या वादामध्ये विद्यार्थी संघटनेने मर्यादेचे उल्लंघन केले आहे.. कार्यकर्त्यांनी नेत्याच्या वैयक्तिक प्रतिष्ठेसाठी प्राचार्याना माफी मागायला लावणे योग्य नाही.. हिंदुजा महाविद्यालयाच्या माफी प्रकरणासंबंधी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया या कुणा प्राचार्याच्या किंवा शिक्षणतज्ज्ञांच्या नसून त्या आहेत विविध विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींच्या.
युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या संदर्भात कथित आक्षेपार्ह विधान केल्यामुळे संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हिंदुजा महाविद्यालयात प्राचार्याना लेखी माफी मागायला भाग पाडल्याचे प्रकरण सध्या विविध कॅम्पसवर चर्चेचा विषय आहे. गुरुस्थानी असलेल्या प्राचार्याना आपल्या नेत्याच्या प्रतिष्ठेसाठी दिलगिरी व्यक्त करायला लावल्याबद्दल शैक्षणिक वर्तुळात प्रचंड नाराजी व्यक्त होते आहे. तसेच, संघटनांना विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हिताचे प्रश्न कमी पडले की काय ते त्या आता शिक्षणबाह्य़ उपक्रमांसाठी विद्यार्थ्यांची बाजू घेऊन मैदानात उतरू लागल्या आहेत, अशी प्रतिक्रिया सर्वत्र उमटू लागली आहे. आपल्या सहकाऱ्यांविषयी इतर प्राचार्य उघडपणे नाराजी व्यक्त करीत नसले तरी या प्रकरणात विद्यार्थी संघटनांच्या नेत्यांनीच आवाज बुलंद केला आहे.
* आमची दादागिरी विधायक कारणासाठी
तीन आठवडय़ांपूर्वी वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या पुनर्मूल्यांकनाच्या प्रश्नावरून ‘महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठा’च्या विद्वत परिषदेत घुसून कार्यकर्त्यांच्या मदतीने धुडघूस घालणारे ‘राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस’चे प्रदेशाध्यक्ष नीलेश राऊत यांनीही या प्रकाराचा निषेध केला. आमची दादागिरी ही विद्यार्थ्यांच्या विधायक प्रश्नावर होती. बाराशे विद्यार्थ्यांचे करिअर पणाला लागल्याने आम्हाला टोकाची भूमिका घ्यावी लागली. पण, आपल्या नेत्याच्या प्रतिष्ठेसाठी प्राचार्याना वेठीला धरण्याचा प्रकार चुकीचा असून त्याचा निषेधच करायला हवा, अशी प्रतिक्रिया राऊत यांनी व्यक्त केली.
* अनैतिक कृत्य
महाराष्ट्र नवनिमाण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर यांनीही विद्यार्थी संघटनांनी प्राचार्याशी काही प्रश्नांवर मतभेद असल्यास ते चर्चेनेच सोडविले पाहिजे, असे मत व्यक्त केले. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काही मूल्यांचे व तत्त्वांचे भान राखले पाहिजे. प्राचार्याना दिलगिरी व्यक्त करायला लावणे अनैतिक आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
* अभाविपची भूमिका वेगळी
राजकारणात शिवसेनेसोबत युती असलेल्या भाजपशी जवळीक असलेल्या ‘अखिल भारतीय विद्याथी परिषदे’चे (अभाविप) प्रदेशाध्यक्ष आणि सोमैय्या कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य नरेंद्र पाठक यांनी मात्र वेगळी भूमिका मांडली. ‘महाविद्यालयाचा कारभार विद्यार्थी आणि प्राचार्य यांच्यातील समन्वयाने साधला गेला पाहिजे. प्राचार्यानी कोणताही निर्णय घेण्याआधी विद्यार्थ्यांना विश्वासात घ्यायला हवे होते,’ असे त्यांचे मत पडले. उलट प्राचार्यानी आपल्या विधानाबद्दल आधीच दिलगिरी व्यक्त करायला हवी होती, अशी भूमिका त्यांनी घेतली.
* प्राचार्यामध्ये नाराजी
िहदुजा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी घातलेला धुडगुस पूर्णपणे चुकीचा असून ही केवळ आगामी निवडणुकांची तयारी असल्याचे मत प्राचार्याच्या वर्तुळात पसरू लागले आहे. अनेकदा विद्यार्थी संघटना महाविद्यालयांच्या कामकाजात विनाकारण ढवळाढवळ करतात. महाविद्यालयात कोणत्या गोष्टी असाव्यात या संदर्भात अन्य तिसऱ्या व्यक्तीने दखल घेणे चुकीचे असल्याचे मत कांदिवली येथील निर्मल मेमोरिअल वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. टी. पी. मधू नायर यांनी मांडले.
दरम्यान, अनेक प्राचार्यानी झाल्या प्रकाराबाबत निषेध व्यक्त केला असून आगामी निवडणुका डोल्यासामोर ठेवून विद्यार्थी संघटना पुन्हा सक्रीय झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. महाविद्यालयात कोणते फेस्टिव्हल घ्यावेत किंवा नाही हा पूर्णपणे महाविद्यालयाचा निर्णय असून यात बाहेरच्यांनी हस्तक्षेप करू नये, असेही मत काही प्राचार्यानी व्यक्त केले.
दरम्यान, ‘असोसिएशन ऑफ नॉन गव्हर्नमेंट कॉलेज’तर्फे विद्यार्थी संघटनाच्या अरेरावीबाबत शासनाकडेएक निवेदन सादर केले जाणार असल्याचे सूत्रांकडून समजते.
थोडक्यात पाश्र्वभूमी
केपीबी हिंदुजा या वाणिज्य महाविद्यालयात वर्षभरात तीन सांस्कृतिक महोत्सव होतात. या महाविद्यालयाच्या प्राचार्यपदाचा कार्यभार हातात घेतल्यानंतर डॉ. चित्रा नटराजन यांनी यापैकी एक ‘नेक्सस’ हा महोत्सव बंद करण्याचा निर्णय घेतला. याला विरोध असणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी शिवसेनाप्रणित युवा सेनेशी संघटनेशी संपर्क साधून प्राचार्याची तक्रार केली. त्यावर विद्यार्थी संघटनेला या प्रश्नात आणल्याबद्दल प्राचार्यानी संबधित विद्यार्थ्यांची खरडपट्टी काढली. यावेळी त्यांनी युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या संदर्भात ‘कोण आदित्य ठाकरे?’ असा सावाल केला. विद्यार्थ्यांनी हा संवाद सेलफोनवर रेकॉर्ड करून युवा सेनेच्या कार्यकर्त्यांना ऐकवला. त्यावविरोधात मग त्यांनी प्राचार्याच्या माफीसाठी मोर्चा काढला. युवा सेनेने प्राचार्याकडून माफीनामा लिहून तर घेतलाच; शिवाय त्याच्या प्रती व तो घेतानाचे छायाचित्र प्रसारमाध्यमांना पाठवून ‘मर्दुमकी’ही गाजवली.

Story img Loader