विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात काही राजकीय पक्षांनी थेट बाहुबलींना उतरविले असताना दुसरीकडे गंभीर स्वरूपाचे फौजदारी गुन्हे दाखल असणाऱ्यांना उमेदवारी देऊन सर्वानी जणू काही या अपप्रवृत्तींना ‘पावन’ करण्याचा विडाच उचलल्याचे जाणवत आहे. गत महापालिका व लोकसभा निवडणुकीत ‘नाशिकमधील वाढती गुन्हेगारी’ हा मुद्दा चांगलाच गाजला होता.गुन्हेगारीला राजाश्रय मिळत असल्यामुळे ती फोफावत असल्याचे आरोपही झाले. त्याचा फटका काही राजकीय पक्षांना मतदानातून सहन करावा लागला. असे असूनही उमेदवार निवडताना धन, संपत्तीच्या ताकदसोबत बाहुंमधील बळाचा राजकीय पक्षांनी प्रकर्षांने विचार केला की काय, असा प्रश्न मतदारांसमोर आहे.
जिल्ह्यातील १५ मतदारसंघांतील प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या नावावर नजर टाकल्यास गुन्हेगारी पाश्र्वभूमी असणाऱ्यांची संख्या कमी नसल्याचे दिसते. काही जणांविरुद्ध आंदोलन व तत्सम राजकीय गुन्ह्यांची संख्या अधिक आहे. मात्र, काहीं जणांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
नांदगाव मतदारसंघात शिवसेनेने गुन्हेगारी पाश्र्वभूमीच्या सुहास कांदेला उमेदवारी बहाल केली आहे. काही वर्षांपूर्वी सिडको येथे झालेल्या वाहन जाळपोळीच्या घटनेतील तो संशयित होता. पोलिसांना धडा शिकविण्यासाठी त्याने हा कट रचल्याचे पोलिसांचे म्हणणे होते. परंतु न्यायालयात पुराव्याअभावी त्याची सुटका झाली. कांदेविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा आणणे, शस्त्र बाळगणे यावरून त्याच्याविरुद्ध शहरातील सातपूर, भद्रकाली, अंबड व गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. मध्यंतरी पोलिसांनी कांदेविरोधात तडीपारीचा प्रस्ताव पाठविला होता. परंतु, कांदेने त्याविरोधात न्यायालयात धाव घेतल्यावर प्रस्ताव रद्दबातल झाला. उमेदवारी अर्ज दाखल करताना शक्तिप्रदर्शन करण्यासाठी कांदेने बाहेरून पहिलवान आणल्याची चर्चा मतदारसंघात सुरू आहे.
आजी-माजी लोकप्रतिनिधीही मागे नाहीत
निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आजी-माजी आमदार, नगरसेवक व इतर लोकप्रतिनिधींवर दाखल गुन्ह्यांची संख्या मोठी आहे. त्यातील बहुतांश गुन्हे आंदोलन व तत्सम राजकीय स्वरूपाचे आहेत. नाशिक पश्चिम मतदारसंघातील सेनेचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांच्याविरुद्ध वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत दहा गुन्हे दाखल आहेत. काही महिन्यांपूर्वी पोलिसांनी आपल्याविरुद्ध तडीपारीची प्रक्रिया का करू नये, अशा आशयाची नोटीस बडगुजर यांना बजावली होती. याच मतदारसंघात निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले मनसेचे उमेदवार नितीन भोसले यांच्या विरोधात पाच तर राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजी चुंबळे यांच्याविरुद्ध सहा गुन्हे दाखल आहेत. नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार आ. वसंत गिते यांच्यावर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात नऊ फौजदारी गुन्हे दाखल आहेत, तर याच मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार अजय बोरस्ते यांच्याविरोधात पाच गुन्हे दाखल आहेत. मालेगाव बाह्य मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार दादा भुसे यांच्याविरुद्ध वीज कंपनीच्या अधिकाऱ्याला मारहाण करणे, मोर्चावेळी पोलिसांना धक्काबुक्की करून शासकीय कामकाजात अडथळे आणणे आदी कलमांन्वये गुन्हे दाखल आहेत. नांदगाव मतदारसंघातील भाजपचे उमेदवार अद्वय हिरे यांच्या विरोधातही प्रक्षोभक भाषण करणे, इंटरनेटवर वाईट शब्दात मजकूर टाकून भावना भडकाविणे या स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. मालेगाव मध्य मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार शेख असिफ शेख रशिद यांच्याविरुद्ध चार गुन्हे दाखल आहेत. काही प्रकरणांत आपली मुक्तता झाल्याचेही त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. सिन्नर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार माणिक कोकाटे यांच्याविरुद्ध फसवणूक व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान या प्रकरणी गुन्हे दाखल आहेत. निफाड मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार अनिल कदम यांच्याविरुद्ध पिंपळगाव बसवंत टोल नाक्यावरील तोडफोड, महिला कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. याच मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार दिलीप बनकर यांच्याविरुद्ध चार गुन्हे दाखल आहेत.
गुन्ह्य़ांची नोंद असलेले उमेदवारही रिंगणात
विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात काही राजकीय पक्षांनी थेट बाहुबलींना उतरविले असताना दुसरीकडे गंभीर स्वरूपाचे फौजदारी गुन्हे दाखल असणाऱ्यांना उमेदवारी देऊन सर्वानी जणू काही या अपप्रवृत्तींना ‘पावन’ करण्याचा विडाच उचलल्याचे जाणवत आहे.

First published on: 03-10-2014 at 02:11 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The political parties given assembly seat ticket to criminals