ठाणे शहरातील वेगवेगळ्या भागात आरोग्य सुविधा पुरविण्याच्या दृष्टिकोनातून महापालिकेने उशिरा का होईना ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली असून शहरातील लोकसंख्या विचारात घेऊन नवे रुग्णालय तसेच आरोग्य केंद्र उभारणीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या प्रस्तावानुसार, येत्या दोन वर्षांत शहरातील वेगवेगळ्या भागांत आठ नवी रुग्णालये आणि १५ आरोग्य केंद्रे टप्प्याटप्प्याने उभारण्यात येणार आहेत. तसेच प्रत्येक रुग्णालय सुमारे ५० खाटांचे असणार आहे आणि त्या ठिकाणी सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यासंबंधीच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे येत्या काही वर्षांत ठाणेकरांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळणार असून त्यांची खासगी रुग्णालयातील लूटमारीतून सुटका होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
ठाणे महापालिकेचे कळवा परिसरात छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय असून त्या ठिकाणी ठाणे जिल्ह्य़ातील वेगवेगळ्या भागांतून दिवसाला सुमारे एक हजारहून अधिक रुग्ण उपचारासाठी येतात. शहरात पालिकेचे हे एकमेव रुग्णालय आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून चांगल्या आरोग्य सुविधा पुरविण्यात रुग्णालय प्रशासन अपयशी ठरल्याचे चित्र आहे. त्यामुळे रुग्णालयाच्या कारभाराविषयी ठाणेकर फारसे समाधानी नाहीत. ठाणे शहरात २५ आरोग्य केंद्रे असून त्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य सुविधा देण्यात येतात. तसेच पाच प्रसूती केंद्रे आहेत. प्रत्येकी अडीच लाख लोकसंख्येसाठी किमान एक रुग्णालय तर ५० हजार लोकसंख्येसाठी किमान एक आरोग्य केंद्र आवश्यक आहे. असे केंद्र आणि राज्य शासनाच्या राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान कार्यक्रमाच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद करण्यात आले आहे. ठाणे शहराची लोकसंख्या सध्या २० लाखांच्या घरात पोहचली आहे. पण, लोकसंख्येच्या मानाने सध्या शहरात अशा प्रकारे रुग्णालयाची व्यवस्था नाही. त्यामुळे महापालिकेने शहरात आठ नवे रुग्णालये आणि १५ आरोग्य केंद्रे उभारण्याचा निर्णय घेतला असून त्यासंबंधीच्या प्रस्तावास सर्वसाधारण सभेने नुकतीच मान्यता दिली आहे. तसेच यंदाच्या अर्थसंकल्पात नवीन रुग्णालय आणि आरोग्य केंद्रे उभारण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.
रुग्णालय आणि आरोग्य केंद्रांचा खर्च
ठाणे महापालिकेने प्रस्तावित केलेल्या नवीन आठ रुग्णालये आणि १५ आरोग्य केंद्रे उभारणीसाठी १०८.८० कोटी रुपये खर्च अपेक्षित असून त्यापैकी २०१४ मध्ये प्रत्येकी पाच कोटी याप्रमाणे ४० कोटी रुपये अनुदान शासनाकडून प्राप्त होणार आहे. राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत रुग्णालय उभारणीसाठी केंद्र शासनाकडून ७५ टक्के अनुदान मिळणार आहे. त्यामुळे उर्वरित २५ टक्के म्हणजेच १० कोटी रुपये महापालिकेस खर्च करावा लागणार आहे.

Story img Loader