गेल्या पाऊण महिन्यापासून लोकसत्ता-ठाणे वृत्तान्तने कल्याण-डोंबिवलीतील मीटर डाऊन न करणाऱ्या मुजोर रिक्षाचालकांच्या विरोधात बातम्या देऊन रिक्षा मीटरसक्ती अंमलबजावणीचा सातत्याने पाठपुरावा केला. याचे पडसाद ‘फेसबुक’वरील विविध ग्रुपवरही उमटले आहेत. ‘ठिणगी तर पडली आहे, आता वणवा पसरायला वेळ लागू नये’ असा सूर या प्रतिक्रियांमधून उमटला आहे.
सोशल नेटवर्किंग साईटवरील ‘फेसबुक’ या सर्वात मोठय़ा समुहावर कल्याण-डोंबिवलीशी संबंधित असलेल्या विविध समुहांवरही लोकसत्ता-ठाणे वृत्तान्तच्या बातम्या चर्चिल्या गेल्या. काही जागरूक नागरिकांनी लोकसत्ता-ठाणे वृत्तान्तमध्ये याविषयी आलेल्या सर्व बातम्या ‘सिव्हिक प्रॉब्लेम ऑफ कल्याण-डोंबिवली एरियाज्’, ‘बेधडक-बोला, एकत्र या आणि बदल घडवा’, ‘अॅक्शन ग्रुप फॉर सिव्हिक प्रॉब्लेम्स, कल्याण-डोंबिवली’, ‘कल्याण-डोंबिवली सिव्हिक इश्यू’ या समुहावरही अपलोड करण्यात आल्या. काही जागरूक नागरिकांनी लोकसत्ता-ठाणे वृत्तान्तमध्ये या विषयीच्या आलेल्या बातम्यांचे मेल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, गृहमंत्री आर. आर. पाटील, राज्याचे परिवहन आयुक्त व्ही. एन. मोरे, वाहतूक पोलीस उपायुक्त (ठाणे) डॉ. श्रीकांत परोपकारी यांनाही पाठविले.
अर्थात अद्याप रिक्षा मीटरसक्ती अंमलबजावणी पूर्णपणे झाली आहे, असे म्हणता येणार नाही. पण यापूर्वी जे कधीच झाले नव्हते ते आता दिसू लागले आहे. रिक्षा मीटर डाऊन न करणाऱ्या रिक्षाचालकांच्या विरोधात आरटीओकडे तक्रारी जायला सुरुवात झाली आहे. आरटीओकडूनही त्याची तातडीने दखल घेण्यात येत आहे. रिक्षा चालक-मालक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनीही प्रवाशांच्या बाजूने भूमिका घेऊन रिक्षाचालकांनाही मीटर डाऊन करण्याचे आवाहन केले आहे.
वाहतूक पोलीस अद्यापही सुस्त
रिक्षातून एका वेळेस चार ते पाच प्रवाशांची वाहूतक करणे, डोंबिवली (पश्चिम) भागात (होम प्लॅटफॉर्मच्या बाहेर, विष्णूनगर पोलीस ठाण्याच्या समोर, पं. दीनदयाळ चौक)येथे रस्त्यात वाटेल तशा रिक्षा उभ्या करून वाहतूक आणि पादचाऱ्यांना अडथळा निर्माण करणारे बेशिस्त रिक्षाचालक, कल्याण रेल्वे स्थानकाला पडलेला बेशिस्त रिक्षाचालकांचा विळखा आदींबाबत वाहतूक पोलीस अद्यापही सुस्त आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा