महापालिकेच्या घरकुल गैरव्यवहारातील मुख्य संशयित आमदार सुरेश जैन यांच्यामुळे संपूर्ण राज्यात गाजलेल्या या प्रकरणाचे सोमवारी जळगाव न्यायालयातो नियमित कामकाज होणार आहे.
जैन या सुनावणीस हजर राहणार असल्याने न्यायालय आवार तसेच परिसरात होणारी त्यांच्या समर्थकांची गर्दी लक्षात घेता पोलीस प्रशासनाने आवश्यक ते नियोजन व खबरदारी घेणे सुरू केले आहे. जैन यांना अटक झाल्यावर न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर सुमारे दीड वर्ष ते मुंबईतच होते. न्यायालयीन कामकाजासाठी ते कधीही जळगावात आले नाहीत. प्रकरणाचे कामकाज सुरू होणार असल्याने त्यांच्या वतीने जळगाव कारागृहात हलविण्या संबंधीचा अर्ज न्यायालयात करण्यात आला होता व त्यावर १२ नोव्हेंबर रोजी निर्णय अपेक्षित असताना ४ नोव्हेंबरच्या पहाटेच अनपेक्षितरित्या ते जळगावात दाखल झाले.
१२ नोव्हेंबर रोजी झालेल्या सुनावणीच्या वेळी जैन न्यायालयात हजर होतील अशी त्यांच्या समर्थक व कार्यकर्त्यांना अपेक्षा होती. पण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारेच त्यांनी हजेरी नोंदविली होती. आता मात्र ते २५ नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष न्यायालयात हजेरी लावणार आहेत. १० मार्च २०१२ रोजी घरकुल घोटाळ्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या सुरेश जैन यांची त्वरित सुटका होईल अशी त्यांच्यासह समर्थकांची अपेक्षा होती.

Story img Loader