अतिवृष्टीमुळे रेल्वेसेवा विस्कळीत होण्याच्या ठिकाणांमध्ये आता कुर्ला-घाटकोपरबरोबरच ठाणेपल्याडच्या कळवा आणि मुंब्रा स्थानकांची भर पडली असून कळवा-कोपरदरम्यान खाडीकिनारी होत असलेल्या निसर्गाच्या अर्निबध शोषणाचा हा परिणाम आहे.
मुंब्रा-कोपर भागातील खाडीकिनारी होत असलेल्या अर्निबध रेती व माती उपश्यामुळे या भागातील रेल्वे मार्ग धोकादायक स्थितीत असून ट्रॅक खचून रेल्वेसेवा पूर्णपणे ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. गुरुवारी रात्रीपासून पडणाऱ्या संततधार पावसामुळे मुंब्रा आणि कळवा स्थानकात पाणी साचल्यामुळे सकाळी अप मार्गावरील धिम्या मार्गावरील उपनगरी गाडय़ांची वाहतूक जलद मार्गावर वळविण्यात आली. त्यामुळे ऐन गर्दीच्या वेळी गाडय़ांचे वेळापत्रक बिघडले. बराच वेळ गाडय़ा एकाच जागी थांबून राहिल्याने प्रवाशांना भर पावसात ट्रॅकमधून चालत मुक्काम गाठावे लागले.
मुंब्रा ते कोपर रेल्वे स्थानकांदरम्यान दोन्ही बाजूला मोठय़ा प्रमाणात रेती तसेच माती उपसली जात असून खारफुटीची कत्तल सुरू आहे. गेली अनेक वर्षे हा प्रकार सुरू असून कारवाई कुणी करायची या प्रश्नावरून शासकीय यंत्रणा मात्र सुस्त आहे. कोपर स्थानकाजवळ रेती माफियांनी अगदी रेल्वे मार्गापर्यंत खोदाई केली असून त्यामुळे रेल्वे मार्ग खचून रेल्वेसेवा ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे केवळ उपनगरीच नव्हे तर कर्जत-कसारा मार्गे देशभर जाणाऱ्या लांब पल्ल्यांच्या गाडय़ांच्या वाहतुकीवरही परिणाम होणार आहे.
ठाणेपलीकडच्या उपनगरांमधून मुंबईत येणाऱ्या लाखो चाकरमान्यांना सध्यातरी रेल्वेव्यतिरिक्त कोणतेही वाहतुकीचे साधन नाही. त्यात हल्ली मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांबरोबरच डाऊन मार्गावर कर्जत/कसाराच्या दिशेनेही चाकरमान्यांचा राबता वाढला आहे. त्यामुळे या परिसरात अप आणि डाऊन दोन्ही मार्गावरील गाडय़ांना प्रचंड गर्दी असते. त्यात कोणत्याही कारणाने रेल्वेसेवा विस्कळीत झाली की त्यांच्या हालास पारावार राहात नाही. शुक्रवारच्या अतिवृष्टीने पुन्हा एकदा त्याचे दर्शन घडले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा