मुंबई महापालिकेत ५० टक्के आरक्षणामुळे ‘महिला राज’ आले असले तरी आपले हितसंबंध जपण्यासाठी शिवसेना-भाजपमधील वरिष्ठ नेत्यांनी नगरसेविकांना जेरीस आणले आहे. आपल्या जवळचे विकासक, उद्योजक, व्यापारी आदींच्या अनधिकृत कामांविरुद्ध पालिकेकडे कारवाईचा तगादा लावणाऱ्या नगरसेविकांना साम, दाम, दंड, भेद नीतीचा अवलंब करून त्रास दिला जात आहे. पक्षप्रमुखांकडे तक्रार करूनही काही उपयोग होत नसल्याने शिवसेना-भाजपमधील नगरसेविकांचे आता खच्चीकरण होऊ लागले असून नगरसेविकांना असुरक्षित वाटू लागले आहे.
शिवसेना आणि भाजपमधील अनेक नेत्यांनी आपापल्या विभागातील विकासक, उद्योजक, व्यापारी यांच्याशी हितसंबंध जपले आहेत. पक्षाच्या तिजोरीत ‘नजराणे’ पोहोचवतानाच हे नेते स्वत:ही गबर झाले आहेत. पालिका निवडणुकीत ५० टक्के महिला आरक्षणाची घोषणा होताच या नेत्यांच्या पोटात गोळा उठला होता. आपल्या समर्थकांच्या पत्नी, भगिनी, मुलीला तिकीट मिळवून देण्यासाठी त्यांनी बरीच खटपट केली. पण काही ठिकाणी नेत्यांची डाळ शिजली नाही. अशा आपल्या मर्जीबाहेरच्या महिला निवडून आल्यावर नेत्यांनी त्यांच्या कामामध्ये अडथळे निर्माण करायला सुरुवात केली.
अनधिकृत बांधकामे, झोपडपट्टी, खारफुटीची कत्तल, खाजणात भरणी, मैदाने आणि नाल्यांच्या काठांवरील अतिक्रमणे अशा अनेक बेकायदा कामांना सर्वच पक्षांमधील नेत्यांचा आशीर्वाद आहे. या आशीर्वादामुळेच पालिकेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांचेही फावत आहे. नवख्या नगरसेविकांना या आशीर्वादाची गंधवार्ताही नाही. पक्षप्रमुखांच्या ‘करून दाखविण्या’च्या नादात नगरसेविकांनी आपापल्या परिसरात बेधडक विकासकामे सुरू केली. त्याचबरोबर अनधिकृत कामांविरुद्ध आवाजही उठविला. या कामांमुळे पक्षाची प्रतिमा उजळून निघत असताना नगरसेविकांना मात्र वरिष्ठ नेत्यांकडून होणारी कुचंबणा सहन करावी लागली. कधी मोबाइलवरून धमकी, तर कधी जाहीर कार्यक्रमात इशारा असे प्रकार सुरू झाले. याकडे दुर्लक्ष करीत नगरसेविकांचे काम सुरूच होते. मग नगरसेविका आपल्याला जुमानत नाही, हे पाहून नेते मंडळींनी आपले ‘नेटवर्क’ कामाला लावले. सार्वजनिक प्रसाधनगृहांतील भिंतींवर एका नगरसेविकेचा मोबाइल क्रमांक लिहून ठेवण्यात आला. परिणामी रात्री-अपरात्री तिचा मोबाइल खणखणू लागला. अर्वाच्य-अश्लील संभाषणामुळे नगरसेविका हैराण झाली.
तिने पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी प्रसाधनगृह शोधून काढले आणि भिंतीवरील मोबाइल क्रमांकावर रंग मारला. दोन दिवस मोबाइल शांत राहिला. पण तिसऱ्या दिवशी पुन्हा खणखणू लागला. शेवटी पोलीस आणि कार्यकर्त्यांच्या मदतीने नगरसेविकेने प्रसाधनगृह शोधून काढले आणि तेथील नंबरही पुसून टाकला. मात्र अजूनही हे प्रकार थांबलेले नाहीत. आजही रात्री-अपरात्री मोबाइलवर फोन येतात. त्यामुळे नगरसेविकेचे कौटुंबिक स्वास्थ्यही बिघडू लागले आहे.
नियमबाहय़ काम करणाऱ्या आपल्या कार्यकर्त्यांला समज देणाऱ्या भाजपच्या नगरसेविकेला शिवसेनेच्या एका नेत्याने त्रास देण्यास सुरुवात केली आहे. कार्यकर्त्यांच्या माध्यमातून तिच्याबद्दल अपप्रचार सुरू केला आहे. तसेच फेसबुकच्या माध्यमातूनही या नगरसेविकेची बदनामी सुरू आहे. भाजपमधील नगरसेविकेने आपल्या नेत्यांच्या कानावर ही बाब घातली. मात्र आपला ‘याराना’ जपण्यासाठी भाजप नेत्यांनीही हात वर केले. नगरसेविकांच्या कामात अडथळे निर्माण करणे हा काही एका विभागातील प्रकार नाही. मुंबईभरातील नगरसेविका त्या त्या भागातील नेत्यांच्या कुलंगडय़ांमुळे त्रस्त झाल्या आहेत. पक्षप्रमुख भेट देत नसल्यामुळे नगरसेविकांना गाऱ्हाणेच मांडता येत नाही. नगरसेविकांना त्यांची ‘जागा’ दाखवून देण्याच्या प्रकारामुळे त्यांचा आत्मविश्वास डळमळू लागला आहे.
सत्ताधारी नगरसेविका महापालिकेतच असुरक्षित!
मुंबई महापालिकेत ५० टक्के आरक्षणामुळे ‘महिला राज’ आले असले तरी आपले हितसंबंध जपण्यासाठी शिवसेना-भाजपमधील वरिष्ठ नेत्यांनी नगरसेविकांना जेरीस
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 07-01-2014 at 06:27 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The ruling corporator unsafe in municipal corporation