कृष्णेच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या जोरदार पावसामुळे कृष्णा, पंचगंगा नद्यांच्या पाणी पातळीत झपाटय़ाने वाढ होत असून लोकवस्तीला धोका पोहचू नये यासाठी खबरदारी म्हणून कर्नाटकातील अलमट्टी धरणातून प्रतिसेकंद ३८ हजार ८०० क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. आज वारणा, कोयना,पंचगंगा नदीत धरणातील पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला असून सायंकाळी ५ वाजता संपलेल्या २४ तासात सर्वाधिक पावसाची नोंद महाबळेश्वर येथे १७० मि.मी. झाली.
चांदोली येथील वसंतसागर धरणात पाणीसाठा ८१ टक्के झाला असून या भागात रात्रीपासून पावसाची संततधार सुरु आहे. पाटबंधारे विभागातर्फे शनिवार सकाळपासून या धरणातून ५८०० क्युसेक्स प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. धरणाचे दरवाजे २ फुटांनी उचलण्यात आले आहेत. तसेच कोयनेवरील शिवसागर जलायशयातून पाण्याचा विसर्ग आजपासून वाढविला आहे. या ठिकाणाहून १२४१६ क्युसेक्स प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. कोयना धरणातील पाणीसाठा ८३.८० टी.एम.सी. झाला आहे. धोम धरणातील पाणीसाठा ८.२६ टी.एम.सी. झाला आहे. दूधगंगा धरणातून ८००० व राधानगरी धरणातून २२०० क्युसेक्स प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. कृष्णा, कोयना, वारणा, पंचगंगा या नदी पात्रात मोठय़ा प्रमाणात पाणी आहे.
सांगली पाटबंधारे विभाग नदीकाठच्या गावांचा धोका टाळण्यासाठी अलमट्टी धरण व्यवस्थापनाशी सातत्याने संपर्कात आहे. कोयना,चांदोली,दूधगंगा व राधानगरी धरणातील पाण्याचा विसर्ग अलमट्टी धरण व्यवस्थापनाला कळविण्यात आला असून अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. या धरणातून प्रतिसेकंद ३८ हजार ८०० क्युसेक्स पाणी सोडण्यात येत असल्याची माहिती सांगली पाटबंधारे मंडळाकडून सायंकाळी देण्यात आली. अलमट्टी धरणातील पाणी पातळी ५१८.३० मीटर झाली असून या धरणाची उच्चतम पाणी पातळी ५१९.६० मीटर आहे.
कृष्णेच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर अद्याप कायम आहे. शनिवारी सायंकाळी ५ वाजता कोयना येथे १०१, धोम येथे ४२, महाबळेश्वर येथे १७० आणि नवजा येथे १३६ मि.मी. पावसाची नोंद झाली असल्याचे पाटबंधारे विभागाच्या पूरनियंत्रण कक्षातून सांगण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा