वन्यप्राण्यांमुळे पिकांची नासाडी होऊ नये आणि शेतक ऱ्यांनाही अत्यंत सुरक्षित ठरावे, असे सौर कुंपण तयार करण्यात शहरातील अयोध्या नगरातील बायो मेडिकल इंजिनियर अविनाश जाधव यांना यश आले आहे.
जंगलाला लागून शेत असलेल्या शेतक ऱ्यांना रानडुकरे, नीलगाय, हरीण, सांबर यांचा अतिशय त्रास होत आहे. वन्यप्राण्यांमुळे शेतक ऱ्यांचे जवळपास ७५ टक्के पिकांचे नुकसान होते. पिकांचे नुकसान होऊ नये म्हणून शेतकरी शेताला तारेचे कुंपन लावून कृषी मोटारपंपासाठी आलेला वीज पुरवठा अथवा शेतातून गेलेल्या विद्युत वाहिनीतून वीज पुरवठा कुंपणाला जोडतात. यामुळे पाळीव व वन्यप्राण्यांसह मनुष्याचीही जीवितहानी होत आहे. वाघ व बिबटय़ांचा अनेकदा यामुळे मृत्यू झाला आहे.
चंद्रपूर, उमरेड, वर्धा, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा परिसरात वन्यप्राण्यांवर विषप्रयोगही करण्यात येत आहेत. कणकेच्या गोळ्यात दारूगोळा वापरला जातो. रानडुकरांना मारण्यासाठी टोळीला बोलविल्या जाते. वर्धा, बोर, उमरेड, चंद्रपूर व अमरावती भागात रात्रीला शेताच्या कुंपणाला वीज प्रवाह लावला जातो. यात अनेक वन्यप्राण्यांचा मृत्यूही झाला आहे. अशा घटनांकडे अविनाश जाधव यांनी गांभीर्याने बघून वन्यप्राणी व शेतक ऱ्यांची जीवित हानी होणार नाही आणि पिकांचेही रक्षण होईल, असे सौर कुंपण तयार केले आहे. हे कुंपण लावायला दीड ते दोन लाख रुपये खर्च येतो. सामान्य शेतक ऱ्यांना हे परवडणारे नसल्याने बॅटरीवर चालणारे स्वस्त व सोपे सौर कुंपण त्यांनी तयार केले आहे. या कुंपणाचा प्रयोग त्यांनी त्यांच्याच शेतावर केला. कुठलीही जीवित हानी होणार नाही, याची काळजी त्यांनी घेतली आहे. डी.सी. हाय होल्टेजचा झटका प्रतिसेकंदाला दिला जातो, त्यामुळे वन्यप्राणी दुसऱ्यांदा अशा शेताकडे फिरकत नाही. या उपक्रमाचा शेतक ऱ्यांना नक्कीच लाभ होईल, असा दावा जाधव यांनी केला आहे. काडय़ांवर इन्सुलेटरद्वारे साध्या तारेने हे कुंपण तयार करण्यात येते. हे इन्सुलेटरही त्यांनी स्वत:च तयार केले आहे.
१८६ लोकांचा मृत्यू
पिकांच्या संरक्षणासाठी तारेच्या  कुंपणात वीज प्रवाह सोडण्यात आल्यामुळे नागपूर जिल्ह्य़ात गेल्या तीन वर्षांत १८६ लोकांचा आणि २३८ वन्यप्राण्यांचा विजेच्या धक्कयाने मृत्यू झाला आहे. अविनाश जाधव यांनी केलेल्या संशोधनाने जीवित हानी होण्याची भीती नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा