श्री साईबाबा संस्थानच्या साई प्रसादालयात कार्यान्वित केलेल्या सौरऊर्जेवरील कुकिंग प्रकल्पाचा धार्मिक क्षेत्रातील सर्वात मोठा प्रकल्प म्हणून केंद्रीय अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाने गौरव केला आहे. त्याबद्दल येत्या दि. १७ ला नवी दिल्ली येथे केंद्रीय अपारंपरिक ऊर्जामंत्री डॉ. फारूख अब्दुल्ला यांच्या हस्ते संस्थानला पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
संस्थानचे कार्यकारी अधिकारी अजय मोरे यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, साईबाबा संस्थानने श्रीसाई प्रसादालयात बनविण्यात येणा-या प्रसाद भोजनालयात अपारंपरिक ऊर्जेचा सर्वात मोठा सोलर स्टिम कुकिंग प्रकल्प उभारला आहे.  जुलै ९ मध्ये हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला. या प्रकल्पामुळे दररोज सरासरी २६० किलो गॅसची बचत होऊन त्याद्वारे प्रचलित दरानुसार २१ हजार रुपयांच्या इंधनाची बचत होते. प्रकल्प कार्यान्वित झाल्यापासून आजपर्यंत ३९ लाखांची बचत झाली आहे. शिवाय दिवसेंदिवस वाढत जाणा-या गॅसच्या दरवाढीनुसार इंधन खर्चाच्या बचतीमध्ये वाढच होत राहील.
या प्रकल्पास केंद्रीय अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाने एकमेव आदर्श प्रकल्प म्हणून घोषित केले आहे. त्यासाठी १३ लाख ६० हजार रुपयांचे अनुदानही मंजूर करण्यात आले आहे. संस्थानला मिळालेल्या या पुरस्काराबद्दल संस्थानचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश जयंत कुलकर्णी, सदस्य तथा जिल्हाधिकारी डॉ. संजयकुमार व उपकार्यकारी अधिकारी तथा तहसीलदार अप्पासाहेब शिंदे यांनी प्रसादालय विभागाचे प्रशासकीय अधिकारी उत्तम गोंदकर, यांत्रिक विभागाचे प्रमुख अमृत जगताप व कर्मचा-यांचे अभिनंदन केले.

Story img Loader