जिल्ह्य़ाचा विकास साधताना अनेक अडचणी आहेत. विकासासंबंधीच्या फायली मंत्रालयस्तरावर वेगवेगळ्या विभागात पडून राहू नये, त्या दूर करून विकासाला गती देण्यासाठी गडचिरोली जिल्हा विकास प्राधीकरण स्थापण्याचे शासनाने जाहीर केले.या प्राधिकरणामुळे विकास कामांना गती येईल, असे प्रतिपादन जिल्ह्य़ाचे पालकमंत्री व गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी केले.
येथील सुप्रभात मंगल कार्यालयात आयोजित गडचिरोली जिल्हा विकास प्राधिकरण याविषयी चर्चासत्राच्या समारोपीय प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, आमदार आनंदराव गेडाम, आमदार दीपक आत्राम, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते देवाजी तोफा, अरविंद सावकार पोरेडीवार आदी उपस्थित होते.आर.आर. पाटील म्हणाले की, जिल्ह्य़ाचे प्रश्न आहेत त्या पलिकडे जाऊन विकास साधावयाचा आहे. जिल्ह्य़ाची संस्कृती व परंपरा जोपासून लोकांसाठी काम करण्याची गरज आहे. विकास कामात येणारे अडथळे दूर करून विकास साधण्याचा प्रयत्न केला जाईल व त्यासाठी विकास प्राधिकरण अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले जातील.यावेळी माजी राज्यमंत्री विजय वडेट्टीवार, प्रा. डॉ. श्रीनिवास खांदेवाले, मोहन हिराभाई हिरालाल, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Story img Loader