शेअर बाजाराने एकदम उसळणे किंवा गडगडणे ही सहज घडणारी घटना नसून ते ‘इंटेलेक्च्युअल करप्शन’ आहे. शेअर बाजार म्हणजे सट्टा असून सामान्य माणसाने त्यासाठी सावधपणे पावले उचलायला हवीत. शेअर बाजारचे विकेंद्रीकरण होणे सामान्यांच्या फायद्याचे आहे, असे मत मुंबईतील इनोव्हेशन अॅण्ड नॉलेज मॅनेजमेंट व्यूहतंत्रज्ञ तुलसी टावरी यांनी ‘लोकसत्ता’शी  बोलताना व्यक्त केले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ‘ई.एफ. शुमाकर स्मृती व्याख्यानमाले’चे पुष्प गुंफण्यासाठी ते नागपुरात आले होते. मंगळवारी ८५५ अंकाने शेअर बाजार गडगडले, त्यावर त्यांनी रोखठोक प्रतिक्रिया व्यक्त केली. अशा प्रकारे बाजार गडगडने यात आंतरराष्ट्रीय घडामोडींचा काहीही संबंध नसून हे केवळ  ‘इंटेलेक्चुअल करप्शन’ आहे. एक तासात पैसे दुप्पट होणे किंवा अध्र्या तासात संपत्ती अर्धी होणे हे शक्य नसते. शेअर बाजार म्हणजे निव्वळ सट्टा असून शहाण्यांनी फार सावधपणे पैसे गुंतवायला हवेत. त्यासाठी कंपनी, तिच्यातील नव उपक्रम, विश्वासार्हता या सर्व बाबी तपासूनच सामान्य गुंतवणूकदारांनी त्याकडे पाहायला हवे. शेअर बाजारची ८५५ अंकाने गडगडण्यामागचे कारण सिरियातील तेल संकट असल्याचे सांगितले जाते. मात्र, त्याचा काहीही संबंध नसल्याचे टावरी यांनी स्पष्ट केले.
असंतोषाचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकमान्य टिळकांना राजकीय व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाते. मात्र, ते एक चांगले उद्योजक होते, याकडे टावरींनी लक्ष वेधले. लोकमान्य टिळकांनी ‘ग्लास फॅक्टरी’ उभारली. कंपनीचे शेअर त्यांनी एकेक रुपयांना विकले. अनेक हातांना त्यांनी त्याकाळात काम मिळवून दिले. शेअर विक्रीतून त्यांना पैसा कमावता येतो. याचे ते उत्तम उदाहरण होय. हल्ली व्यावसायिक वाहिन्यांवर बोलावण्यात येणाऱ्या अर्थतज्ज्ञांचा सुकाळ असून त्यांचे कंपन्यांशी साटेलोटे असते. या तज्ज्ञांना कंपन्यांकडून चांगले पैसे मिळतात, असा आरोपही टावरी यांनी केला. शेअर बाजारातील अनेक कचरा कंपन्यातून चांगल्या कंपन्या हुडकून सामान्य गुंतवणूकदारांनी पैसे गुंतवायला हवेत. त्यासाठी कंपनीच्या मालकाची विश्वासार्हता, त्यांचे उत्पादन, त्यासाठी केली जाणारी मेहनत आणि भविष्यात ते उत्पादन तग धरू शकण्याची शक्यता गुंतवणूकदारांनी तपासून नंतरच बाजारात पैसा लावायला हवा. शेअर बाजार मुंबईलाच एका ठिकाणी गोठवण्यापेक्षा तो अनेक ठिकाणी हवा. शेअर बाजारचे विकेंद्रीकरण झाल्यास गुंतवणूकदारांना पैसा गुंतवणे अधिक सोपे जाईल, असेही टावरी म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा