उपनगरीय रेल्वेमार्गाने मुंबईत प्रवास करणाऱ्या ८० लाख प्रवाशांपैकी पाच लाख विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करत मध्य आणि पश्चिम या दोन्ही रेल्वेंनी एप्रिल महिन्यात दंडापोटी तब्बल २० कोटी रुपयांची रक्कम गोळा केली आहे. मध्य रेल्वेने गर्दीचा उन्हाळी हंगाम लक्षात घेता इतर विभागांतून तब्बल २५० तिकीट तपासनीस मुंबई विभागात आणले होते, तर पश्चिम रेल्वेने आपल्या ताफ्यातील तिकीट तपासनीस, आरपीएफ कर्मचारी यांच्या साहाय्याने ही कारवाई केली.
मध्य रेल्वेमार्गावर ११.०३ कोटी रुपये वसूल करण्यात आले असून पश्चिम रेल्वेवर हा आकडा नऊ कोटी एवढा आहे. विशेष म्हणजे या दोन्ही मार्गावर फुकटय़ा प्रवाशांच्या संख्येत गेल्या वर्षीच्या तुलनेत अनुक्रमे ३१.३१ आणि २० टक्के वाढ झाली आहे. मध्य रेल्वेमार्गावर एप्रिल २०१४ या महिन्यात २.१४ लाख बेकायदेशीर प्रवाशांना पकडण्यात आले. मध्य रेल्वेकडे सध्या तिकीट तपासनीसांची वानवा असल्याने या उन्हाळी हंगामात नागपूर, पुणे, भुसावळ अशा पाच विभागांतून रेल्वेने प्रत्येकी ५० तिकीट तपासनीस मुंबईत नियुक्त केले होते. या तिकीट तपासनीसांच्या वाढलेल्या संख्येमुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत या एप्रिल महिन्यात तब्बल तीन कोटी रुपयांचा जादा महसूल मध्य रेल्वेने कमावला. या महिन्यात मध्य रेल्वेने तब्बल २.१४ लाख फुकटय़ा प्रवाशांवर कारवाई केली. गेल्या वर्षी ही संख्या १.६७ लाख एवढी होती.
पश्चिम रेल्वेनेही सततच्या तिकीट तपासणी मोहिमेच्या जोरावर एप्रिल महिन्यात नऊ कोटी रुपये दंडापोटी वसूल केले. यासाठी पश्चिम रेल्वेने एप्रिल महिन्यात विविध स्थानकांवर १७८ तिकीट तपासणीच्या मोहिमा आखल्या होत्या. या तिकीट तपासणीच्या मोहिमांमध्ये पश्चिम रेल्वेचे तिकीट तपासनीस आणि आरपीएफचे जवान यांचा वाटा होता. या मोहिमांद्वारे पश्चिम रेल्वेने तब्बल २.०७ लाख प्रवाशांना विनातिकीट प्रवास करताना पकडले. त्याशिवाय ३०३ तिकीट दलालांनाही पश्चिम रेल्वेने वेसण घातली.
प्रवाशांच्या सोयीसाठी एटीव्हीएम, सीव्हीएम, जेटीबीएस अशा विविध नवनव्या संकल्पना रेल्वे राबवत आहे. प्रवाशांना फार वेळ रांगेत उभे राहावे लागू नये, यासाठी या संकल्पना अमलात आणल्या आहेत. त्यामुळे विनातिकीट प्रवास करण्याऐवजी प्रवाशांनी योग्य तिकीट काढूनच प्रवास करावा, असे आवाहन मध्य तसेच पश्चिम रेल्वे प्रशासनाने केले आहे.
फुकटय़ा प्रवाशांकडून उपनगरीय रेल्वेला २० कोटींचे उत्पन्न
उपनगरीय रेल्वेमार्गाने मुंबईत प्रवास करणाऱ्या ८० लाख प्रवाशांपैकी पाच लाख विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करत मध्य आणि पश्चिम या दोन्ही रेल्वेंनी एप्रिल महिन्यात दंडापोटी तब्बल २० कोटी रुपयांची रक्कम गोळा केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 20-05-2014 at 06:13 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The suburban railway earned 20 crore income from free passengers