जागतिक स्तरावर वाघांचे संरक्षण व संवर्धन व्हावे याकरिता सेंट पीटसबर्ग येथे झालेल्या व्याघ्र परिषदेत २९ जुलैला जागतिक व्याघ्र दिन घोषित करण्यात आला. या दिवशी वाघाप्रती जनजागृती निर्माण करण्यासाठी जागतिक स्तरावर विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. याचेच औचित्य साधून २९ जुलैला स्थानिक गांधी चौकामधून वन विभागातर्फे जनजागृती पदयात्रा काढण्यात आली.
या पदयात्रेचे आयोजन ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर वनवृत्त आणि इको-प्रो संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले. यावेळी चंद्रपूर वन वृत्ताचे मुख्य वनसंरक्षक संजय ठाकरे यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखवली. यावेळी ताडोबा कोअरचे उपसंचालक सुजय डोडल, उपवनसंरक्षक मदन कुळकर्णी, सहायक वनसंरक्षक एन.डी.कुरसंगी, इको-प्रोचे बंडू धोत्रे उपस्थित होते. या पदयात्रेत वाघाच्या वेशभूषेमध्ये असणारे दोन विद्यार्थी लोकांचे लक्ष वेधून घेत होते. या रॅलीत शहरातील विविध शाळेचे विद्यार्थी सहभागी झाले होते. यात छोटूभाई पटेल हायस्कूल, एफईएस गर्ल्स हायस्कूल, लोकमान्य टिळक कन्या विद्याालय, ज्युबिली हायस्कूल, हिंदी सिटी हायस्कूल या शाळेचा प्रामुख्याने सहभाग होता. या रॅलीत गांधी चौकातून जटपुरा गेट व नंतर कस्तूरबा मार्गाने गांधी चौक येथे विसर्जित करण्यात आली. यावेळी वाघ वाचवा जंगल वाचवा, रक्षण करा रक्षण करा, वाघाचे रक्षण करा आदी घोषणांनी चंद्रपूर शहर दुमदुमले.
त्याचप्रमाणे वनराजिक महाविद्यालयात छायाचित्र प्रदर्शनाचे सुध्दा आयोजन करण्यात आले होते.
या रॅलीत व छायाचित्र प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी मोठय़ा संख्येने सहभाग घेतला होता, तसेच या दिनानिमित्त जिल्ह्य़ातील सर्वच वनपरिक्षेत्रस्तरावर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यात ग्रामस्थांना व्याघ्र दिनाचे महत्व पटवून देण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा