जुन्याचा विसर आणि नव्या पुजेसाठी नवे देव शोधणे हा माणसाचा स्थायीभाव आहे. याच न्यायाने साहित्यात आज जे लोकप्रिय आहेत ते उद्या असतीलच असे नाही. मराठी लघुकथेच्या भरभराटीचा काळ संपून विपन् नावस्थेचा काळ सुरू झाला आहे, अशी खंत माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी कल्याण येथे व्यक्त केली.
कल्याण येथील पु.ल.कट्टय़ाच्या वतीने लघुकथालेखक अंबादास अग्निहोत्री यांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्त आयोजित कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर आले होते. कल्याणच्या आचार्य अत्रे रंगायतनजवळील सुभाष मैदानातील पु.ल. कट्टय़ावर हा कार्यक्रम पार पडला. चपळगावकर यांनी आपल्या भाषणात लघुकथांच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. आज लघुकथा कितीही चांगली असली तरी ती प्रसिद्ध करण्यासाठी माध्यमच उरलेले नसून वाचकही कमी होऊ लागले आहेत. कथेचा अनुभव वास्तवाचे भान करून देणारा असला तरी त्याकडे गांभीर्याने पाहण्यासाठी आणि तो अनुभवण्यासाठी आपल्याकडे वेळच उरलेला नसल्याचे त्यांनी सांगितले. लघुकथा या पूर्णपणे काल्पनिक नसतात तर सत्य घटनांवर थोडेफार संस्कार करून लघुकथा जन्माला येतात. कथेतला अनुभव हा जीवनाचा छोटासा तुकडा असतो. मात्र आज मराठी कथा प्रसिद्ध करण्यासाठी माध्यमच नसल्याने आणि आयुष्यातील सौंदर्य पाहण्यासाठी स्वास्थ्य आणि मोकळा वेळ उरला नसल्याने जीवनातील सौंदर्यस्थळे आपण विसरत आहोत, असेही त्यांनी सांगितले.  
विस्मृतीत गेलेला साहित्यिक..
मुळचे नाशिकचे असलेले अंबादास अग्निहोत्री कल्याणमध्ये स्थायिक झाले होते. मुद्रितशोधक म्हणून कार्यरत असलेल्या अग्निहोत्री यांनी स्तंभलेखन व कथालेखनही केले. मौज साप्ताहिकात त्यांनी माणूस या टोपण नावाने कथालेखन केले. माणसाच्या गोष्टी, मुक्ता, वृंदा, साखरपुडा, रहाटगाडगं या त्यांच्या गाजलेल्या कथा होत्या. हिमगौरी, सातबुटके आणि बिरबलाच्या गोष्टी हे बालसाहित्यही त्यांनी लिहिले. आजच्या पिढीला त्यांची ओळख होण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे अत्रे कट्टय़ाचे अ.ना.भार्गवे यांनी सांगितले.

Story img Loader