एकेकाळी मुंबईकरांची तहान भागविणाऱ्या विहिरींची ‘चोरी’ होऊ लागली असून वातावरणातील प्राणवायूचे संतुलन राखणारे वृक्ष गायब होत असल्याची तक्रार नगरसेवकांनी गुरुवारी पालिका सभागृहात केली. मात्र या संदर्भात चौकशी करण्यास हतबलता दखवत पालिकेने हा प्रश्न झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या कोर्टात ढकलून हात झटकले.
भांडूप परिसरात साई हिल, कोकण नगर, कांजूर नेहरू नगर, मंगतराम, शिवनगर, कर्वे नगर, कांजूरमार्ग (पूर्व); सहजीवन एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्था (मर्यादित), कोकण नगर आदी परिसरांमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या माध्यमातून विकासकामे सुरू आहेत. विकास कामाच्या आड येणारी झाडे, विहिरी आणि पाण्याचे इतर स्रोत सर्रास नष्ट करण्यात येत आहेत, अशी तक्रार शिवसेना नगरसेवक अशोक पाटील यांनी केली. रहिवाशांना विकासकामांतून उपलब्ध होणारी उद्याने, बालवाडय़ा, प्राथमिक आरोग्य केंद्र, खेळाचे मैदान, प्रार्थनास्थळे आदींचा वापर निराळ्या पद्धतीने करण्यात येत आहे. झाडांच्या कत्तलीमुळे पर्यावरणाचा तोल ढसळत असून विहिरी आणि पाण्याचे स्रोत बुजविल्याने पाणी टंचाईची तीव्रता वाढेल, असेही पाटील यांनी यावेळी सांगितले. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करुन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
आपापल्या प्रभागांमधील विकासाआड येणाऱ्या विहिरींची चोरी आणि झाडे गायब झाल्याची व्यथा सर्वच पक्षाच्या नगरसेवकांनी यावेळी मांडली. पाणीटंचाईच्या काळात मुंबईकरांची तहान भागविण्यास मदत करणाऱ्या विहिरी नष्ट होत असल्याबद्दल सभागृहात चिंता व्यक्त करण्यात आली.
भांडूपमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाअंतर्गत सुरू असलेल्या विकासकामाच्या ठिकाणची विहीर व झाडे गायब आहेत. त्यामुळे या प्रकरणात पालिकेला हस्तक्षेप करता येणार नाही, असे सांगून अतिरिक्त आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी या प्रकरणातून हात झटकले. मंगतराम येथे विहिरीचा व्यास कमी केल्याप्रकरणाची पोलिसात तक्रार नोंदवावी, असे पत्र पाठवून झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाला कळविली होते. त्यासाठी पुन्हा एकदा स्मरणपत्रही पाठविले होते, असेही ते म्हणाले.