चार ब्रास वाळू भरली, तरी केवळ एक ब्रासची पावती देऊन ठेकेदार आपले उखळ पांढरे करून घेतात. मात्र, रस्त्यावर पोलिसांकडून पावतीपेक्षा जास्तीच्या वाळूची वाहतूक करणाऱ्या चालकांना पकडून दंड आकारला जातो. अशा प्रकारे चोरी ठेकेदाराची व दंडाची शिक्षा मात्र वाहतूकदाराला या प्रकारामुळे संतप्त झालेल्या जिल्हय़ातील सुमारे ७०० वाळू वाहतूकदार चालकांनी अखेर वाळूची वाहतूक बंद केली.
जिल्हय़ात महसूल प्रशासनाने गोदावरी पात्रासह अनेक ठिकाणी वाळूचे ठेके दिले आहेत. वाळूची तस्करी थांबविण्यास वाहतूक करताना ठेकेदाराची पावती आवश्यक असते. मात्र, ठेकेदार ४ ब्रास भरल्यानंतरही केवळ एक ब्रासची पावती चालकाना देतात. परिणामी अवैध वाळूचा उपसा ठेकेदार रासरोस करतात. यातून अधिकारी व ठेकेदार यांचे उखळ पांढरे होते. प्रत्यक्षात वाहतूक सुरू असताना पोलीस मालमोटार चालकांकडे वाळूची पावती मागतात. पावतीपेक्षा जास्त वाळू असल्यामुळे दंड आकारतात व गुन्हे दाखल करतात. या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या वाळू वाहतूक करणाऱ्या मालमोटार चालकांनी आता वाहतूक न करण्याचा पवित्रा घेतला आहे. पोलिसांनी ठेकेदारांचीही चौकशी करावी व त्यांच्यावरही कारवाई करावी, अशी मागणी चालकांनी केली आहे. या पाश्र्वभूमीवर शुक्रवारी सुमारे २०० वाहतूकदारांनी वाहतूक बंद आंदोलन केले.

Story img Loader