भाजप शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी यांची ग्वाही
महापालिका निवडणुकीत शिवसेनेला कात्रजचा घाट दाखवून स्वबळावर लढण्याचा घेतलेला निर्णय आणि नंतर पालिकेच्या सत्तेत सहभागी होण्यासाठी मनसेला दिलेली साथ, यामुळे मित्रपक्ष शिवसेना स्थानिक पातळीवर दुखावली असल्यास लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर असे काही वितुष्ट असल्यास ते दूर करण्यासाठी भाजप पुढाकार घेईल, अशी ग्वाही भाजपचे शहराध्यक्ष म्हणून पुन्हा सूत्रे सांभाळणाऱ्या लक्ष्मण सावजी यांनी दिली आहे. शहराध्यक्षपदी अविरोध निवड झाल्यानंतर सावजी यांनी आगामी काळात ‘मिशन २०१४’ हे भाजपचे लक्ष्य असून शहर व जिल्ह्यातून काँग्रेस व राष्ट्रवादीला हद्दपार करण्यासाठी अथकपणे प्रयत्न केले जाणार असल्याचे नमूद केले.
शहराध्यक्षपदाच्या चुरशीच्या निवडणुकीत प्रा. सुहास फरांदे, माजी शहराध्यक्ष विजय साने यांच्यासह १२ ते १४ जण इच्छुक होते. प्रदीर्घ काळ चर्चा झाल्यानंतर अखेर सावजी यांच्याकडेच पुन्हा पद ठेवण्यावर एकमत झाले. परंतु, ही निवड जाहीर करण्याच्या सुमारास पक्षांतर्गत खदखद बाहेर आली. यावर टिप्पणी करताना सावजी यांनी निवडणुकीतील नाराजीचा कोणताही परिणाम पक्षाच्या कामकाजावर होणार नसल्याचे स्पष्ट केले. शहराध्यक्ष म्हणून कुणा एकाचीच निवड होणार असते. सर्व इच्छुकांना ते पद मिळू शकत नाही. निवडणुकीच्या निमित्ताने झालेली नाराजी ही तेवढय़ापुरतीच असते. पक्षातील सर्व आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन आपण काम करणार आहोत. कामात काही उणीवा असतील तर, त्या दूर करण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न केले जातील. भाजपचे आता विधानसभा व लोकसभा निवडणूक जिंकणे हे धेय आहे. त्या दृष्टीने पक्षाचे काम केले जाईल. स्थानिक पदाधिकाऱ्यांची निवड सर्व नेत्यांशी चर्चा करून जाहीर केली जाईल, असे ते म्हणाले.
महापालिका निवडणुकीत भाजपने शिवसेनेशी युती न करता स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला होता. त्याचा फटका शिवसेनेला सहन करावा लागला. निवडणूक पश्चात मनसेशी युती करत भाजपने सत्ताही हस्तगत केली. या घडामोडींमुळे शिवसेना पदाधिकारी स्थानिक पातळीवर नाराज झाले. त्यामुळे सेनेशी पुन्हा जुळवून कसे घेता येईल, या प्रश्नावर उत्तर देताना सावजी यांनी असे कोणतेही वितुष्ट निर्माण झाले नसल्याचा दावा केला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाने तो निर्णय घेतला होता. विधानसभा व लोकसभा निवडणुकीतील निर्णय प्रदेश व राष्ट्रीय पातळीवरून घेण्यात आला आहे. समविचारी पक्षांशी युती करून भाजप दोन्ही निवडणुकींना सामोरा जाणार आहे. त्याकरिता मित्रपक्षांशी काही वितुष्ट असल्यास ते दूर करण्यासाठी पुढाकारही घेतला जाईल, असे सावजी यांनी नमूद केले. महापालिका निवडणुकीत पक्षातून हकालपट्टी झालेल्यांना परत पक्षात प्रवेश देण्याविषयी स्थानिक नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. भाजपला कार्यकर्त्यांची गरज आहे. त्यामुळे सर्वाशी चर्चा करून या प्रश्नावर अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी नमूद केले.