नगर व नाशिकचे दोन्ही मंत्री मुख्यमंत्र्यांना न जुमानता मराठवाडय़ाला पाणी देण्यास विरोध करीत आहेत. वरच्या धरणांतील पाणी सोडण्याची हिंमत मुख्यमंत्र्यांना होत नसेल तर त्यांनी या पदावर बसू नये, अशी टीका शिवसेनेचे उपनेते आमदार सुभाष देसाई यांनी केली. दंगल घडवू ही भाषा शोभणारी नाही. ज्या मराठवाडय़ाने रझाकारांना हाकलून लावले, त्यांना कसे लढायचे हे शिकविण्याची गरज नाही. शिवसेना या पुढे मराठवाडय़ाच्या न्याय्य भूमिकेसाठी प्रयत्न करत राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शिवसेनेने मराठवाडय़ातील पदाधिकाऱ्यांसह शुक्रवारी विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला होता. मोर्चानंतर जाहीर सभेत रावते बोलत होते. दुपारी साडेबाराच्या सुमारास क्रांतिचौकातून शिवसेनेने हक्काचे पाणी मिळावे, या मागणीसाठी मोर्चाचे आयोजन केले होते. मोर्चाचे नेतृत्व आमदार सुभाष देसाई यांनी केले.
या वेळी शिवसेनेचे उपनेते दिवाकर रावते, खासदार अनिल देसाई व चंद्रकांत खैरे, गणेश दुधगावकर, आमदार संजय शिरसाट, प्रदीप जैस्वाल, किशनचंद तनवाणी, ओम राजेनिंबाळकर, ज्ञानराज चौगुले आदींची उपस्थिती होती. रावते म्हणाले की, नगरमधील काँग्रेसचे दोन्ही मंत्री मुख्यमंत्र्यांना न जुमानता मराठवाडय़ाला पाणी देण्यास विरोध करीत आहेत. येथील लोक पाण्यासाठी टाहो फोडत आहेत. शेतीकडे कृषिमंत्री विखे यांचे लक्ष नाही. आता पाण्यासाठी आक्रमक आंदोलनच करायला हवे, असेही ते म्हणाले.
निळवंडे धरणाला कालवे नाहीत. आजही तेथे मुबलक पाणी उपलब्ध आहे. मात्र, पाण्याची वाफ झाली तरी चालेल. पण मराठवाडय़ाला पाणी देणार नाही, हा नगर व नाशिक जिल्ह्य़ांतील नेत्यांचा पवित्रा अन्यायकारक आहे. केवळ ‘खुर्ची’ टिकविण्यासाठी काँग्रेसचे दोन मंत्री दंगलीची भाषा करीत आहेत. हा अन्याय होऊ दिला जाणार नाही. त्या विरोधात शिवसेना आंदोलन करेल, असे आमदार देसाई यांनी सांगितले. खासदार खैरे यांनीही नगरच्या नेत्यांवर टीका केली. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीच्या वेळी केलेल्या आंदोलनाचा उल्लेख करत खैरे म्हणाले. सभागृहाबाहेर शिवसैनिक आंदोलन करीत होते आणि सभागृहात पाणीप्रश्नावर मंत्र्यांना आम्ही घाम फोडला होता. यापुढे मराठवाडय़ावरचा हा अन्याय सहन केला जाणार नाही, असे त्यांनी सांगितले. आमदार ओम राजेनिंबाळकर, अर्जुन खोतकर यांचीही भाषणे झाली. जायकवाडीत पाणी सोडावे या मागणीसाठी यापुढील आंदोलन जालना येथे उभारण्यात येईल, असेही माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी सांगितले.
.. तर मुख्यमंत्र्यांनी त्वरित खुर्ची सोडावी – देसाई
नगर व नाशिकचे दोन्ही मंत्री मुख्यमंत्र्यांना न जुमानता मराठवाडय़ाला पाणी देण्यास विरोध करीत आहेत. वरच्या धरणांतील पाणी सोडण्याची हिंमत मुख्यमंत्र्यांना होत नसेल तर त्यांनी या पदावर बसू नये, अशी टीका शिवसेनेचे उपनेते आमदार सुभाष देसाई यांनी केली.
First published on: 09-11-2012 at 11:18 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Then cm should leave the post