कृष्णा खोरेच्या धर्तीवर तापी नदीतील पाण्याचा वापर करावा, शेतकरी व थेट ग्राहक या संकल्पनेला चालना देण्यासह इतर उपाय योजनांद्वारे खानदेशात विकास साधला गेल्यास आगामी निवडणुकीत काँग्रेसला फायदा होईल, पक्षाबद्दल सकारात्मक वातावरण निर्माण होईल, असे वास्तव युवक काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष अ‍ॅड. जवाहर पाटील यांनी प्रदेश काँग्रेसचे निरीक्षक व राज्याचे कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांच्यासमोर मांडले.
धुळे लोकसभा मतदारसंघातील प्रश्न व पक्षाची स्थिती याविषयी विखे यांनी मालेगाव येथे काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या वेळी अ‍ॅड. जवाहर पाटील यांनी धुळ्यासह संपूर्ण खानदेशातील विविध प्रश्न, आवश्यक उपाययोजना याविषयी चर्चा केली.
खानदेशातील कृषीविषयक समस्यांवरही अ‍ॅड. पाटील यांनी उपाय सुचविले आहेत. बांधावर खतवाटप उपक्रम अधिक व्यापक करावा, खते, बियाणे, औषधे यांचे विविध कार्यकारी सहकारी संस्थेमार्फतच वाटप करावे, म्हणजे कृत्रिम टंचाईला आळा बसेल. कृषीपूरक उद्योग उभारणी कृषी पदवी व पदविकाधारक यांना किंवा या क्षेत्रातील अनुभवींना प्राधान्य देण्याचेही अ‍ॅड. पाटील यांनी सुचविले आहे. शेतकी शाळा व महाविद्यालयांमधून पदवी व पदविका मिळविणाऱ्या युवकांना बँकेमार्फत कर्जपुरवठा झाल्यास त्यांना कृषीपूरक उद्योग उभारता येतील. ग्रामीण भागातील विकाससंस्थांशी त्यांची संलग्नता ठेवल्यास बेरोजगार युवक स्वत: शेती सांभाळून हे उद्योग करू शकतील. कुक्कुटपालन, शेळीपालन, गांडूळखत प्रकल्प, गूळ निर्मिती उद्योग, निंबोळी खत प्रकल्प, जैविक औषध प्रकल्प यांसह गुणवत्तापूर्ण बियाणे स्थानिक पातळीवर उपलब्ध होतील. देशी वाणांचे संवर्धन होईल. ठिबक सिंचनास चालना देता येईल. खेडय़ातून शहराकडे जाणारे बेरोजगारांचे लोंढे कमी होतील
सद्यस्थितीत कृषी माल भांडारगृहांच्या कमतरतेअभावी शेतकऱ्यांनी बाजारात नेलेल्या कृषी मालास अपेक्षित भाव मिळत नाही. मात्र त्याच मालाची विक्री करून मध्यस्थी व्यापाऱ्यास मोठय़ा प्रमाणात नफा होतो. त्यामुळे पणन संचालनालय व जिल्हा उपनिबंधकांकडून याकामी देण्यात येणाऱ्या अनुदानात वाढ करून प्रत्येक गावस्तरावर भांडारगृह सुविधा उपलब्ध करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. तापी नदीच्या फुगवटय़ातील पाण्याच्या वापरासाठी कृष्णा खोरे धर्तीवर १०० टक्के अनुदानावर उपसा जलसिंचन योजना लोकसहभागातून मिळाव्यात. सध्या जिल्ह्यात तापीचे पाणी बॅरेजेसद्वारे अडविणे व नंतर ते सोडून देणे एवढेच काम होत आहे.
तापी नदी क्षेत्रात सिंचन क्षेत्र वाढविल्यास नगरप्रमाणे धुळे जिल्ह्यात गाववस्तीवर राहणाऱ्या लोकांचे प्रमाण वाढेल. सिंचन क्षेत्र वाढल्याने उद्योगांसाठी लागणारा कच्चा माल परिसरातून सहज मिळेल. याबाबतीत स्थानिक स्तरावर पाणी वापर समिती असावी. शेतकरी गटांना शेती क्षेत्र प्रमाण मानून १०० टक्के अनुदानावर विविध अवजारे टप्प्याटप्प्याने देण्यात यावेत, तालुक्यातील बीज गुणन केंद्र किंवा फळ रोपवाटिका सक्षमीकरण करण्याकरिता मोठय़ा प्रमाणावर निधी उपलब्ध करून द्यावा, असे अ‍ॅड. पाटील यांनी म्हटले आहे.
कृषी सेवकांच्या रिक्त जागांवर अंशकालीन कर्मचाऱ्यांना सरळ सेवा प्रवेशद्वारे त्यांच्या सेवेचे मूल्यांकन करून नियमित करण्यात यावे, प्रत्येक जिल्ह्यात जैविक कीड नियंत्रण प्रयोगशाळा स्थापन करावी, या मागण्याही करण्यात आल्या आहेत. या वेळी काँग्रेसचे सचिव सत्यजितसिंह गायकवाड, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस शरद आहेर, अ‍ॅड. ललिता पाटील, नाशिक जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, उद्योजक किशोर पाटील, धुळे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर, कुणाल पाटील, युवराज करनकाळ, असिफ शेख आदी उपस्थित होते.

Story img Loader