विवेक सावंत यांचा विश्वास
मराठी भाषा लोकाभिमुख व्यवहाराची करण्याबरोबरच भाषांतराच्या माध्यमातून परकीय भाषाव्यवहाराचे आव्हान पेलण्याचे सामथ्र्य असलेली मराठी आधुनिक माहिती तंत्रज्ञानाच्या साहाय्याने जगावर राज्य करू शकेल, असा विश्वास महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे (एमकेसीएल) व्यवस्थापकीय संचालक विवेक सावंत यांनी सोमवारी व्यक्त केला. ‘सर्व व्यवहार मराठीमध्ये करू आणि तरीही जगाची बाजारपेठ काबीज करू’, हा दिवस लवकर येऊ शकेल, असेही ते म्हणाले.
महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे ‘मराठी भाषा आणि आधुनिक माहिती तंत्रज्ञान’ या विषयावर विवेक सावंत यांचे श्री. म. माटे स्मृती व्याख्यान झाले. परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्र. चिं. शेजवलकर, कार्याध्यक्षा डॉ. माधवी वैद्य आणि प्रमुख कार्यवाह प्रा. मििलद जोशी याप्रसंगी उपस्थित होते.
विवेक सावंत म्हणाले, मराठी भाषा माहिती तंत्रज्ञानाला अनुरूप आहे. त्यामुळे भाषा नव्हे तर, मराठी मानसिकता अनुरूप असणे हीच गरज आहे. मराठी ही जगातील १५ वी मोठी भाषा असून १२ कोटी लोक ही भाषा बोलतात. त्यामुळे मोठय़ा मार्केटचा विचार करून माहिती तंत्रज्ञानाला मराठीचा विचार करावाच लागेल. स्वातंत्र्यानंतरही आम्ही इंग्रजीचे मांडलिकत्व पत्करले. शासकीय भाषा तर, सर्वसामान्यांना कळू नये अशीच आहे. सरकारचे निर्णय संकेतस्थळावर पाहायला मिळतात. ते वाचल्यावर हा मजकूर सुलभ मराठीमध्ये देणारे स्वतंत्र संकेतस्थळ विकसित करण्याची आवश्यकता आहे असेच वाटते.
इंग्रजीमध्ये तरबेज आहेत आणि समाजाधिष्ठीत भाषेवाचून ज्यांचे अडत नाही अशा अभिजनांवर व्यवहाराची प्रमाण भाषा करण्याची जबाबदारी आहे. १२ कोटींचा समूह गट म्हणून एकत्र येऊ शकत नसल्यामुळे गुगल सर्च इंजिनदेखील मराठीला विचारत नाही हे वास्तव आहे. सफाईदार इंग्रजी बोलता येणे हीच सध्या अभिजनाची व्याख्या झाली आहे. अडीच लाख शब्दसाठा असलेली इंग्रजी ही जगाची भाषा झाली. इंग्रजी हाच आपल्या उत्कर्षांचा सोपान अशी मानसिकता झाल्यामुळे ग्रामीण भागातही इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे आकर्षण आहे. स्क्रीनवर दिसली नाही तर मराठी भाषा नामशेष होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे डिजिटल भूमिपुत्रांसाठी योग्य भाषा विकसित करणे हे आव्हान पेलण्याची गरज आहे, याकडे विवेक सावंत यांनी लक्ष वेधले.
संग्रहित लेख, दिनांक 20th Feb 2013 रोजी प्रकाशित
.. तर मराठी भाषा जगावर राज्य करेल
मराठी भाषा लोकाभिमुख व्यवहाराची करण्याबरोबरच भाषांतराच्या माध्यमातून परकीय भाषाव्यवहाराचे आव्हान पेलण्याचे सामथ्र्य असलेली मराठी आधुनिक माहिती तंत्रज्ञानाच्या साहाय्याने जगावर राज्य करू शकेल, असा विश्वास महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे (एमकेसीएल) व्यवस्थापकीय संचालक विवेक सावंत यांनी
First published on: 20-02-2013 at 04:34 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Then marathi language will power over the world