लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या यशानंतर कार्यकर्ते आणि काही पदाधिकाऱ्यांनी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याची मनिषा व्यक्त केली असताना युतीमध्ये तसा निर्णय झाला तर विदर्भातही शिवसेनासुद्धा स्वबळावर लढायला तयार आहे आणि तशी मानसिकता कार्यकर्त्यांनी केली आहे. असे झाले तर गेल्या २५ वषार्ंपासून हिंदुत्वाच्या मुद्दावर एकत्र लढणाऱ्या युतीमधील दोन्ही पक्षांना त्याची किंमत मोजावी लागेल, अशी जनसामान्यात चर्चा आहे.
मुंबईला भारतीय जनता पक्षाच्या राज्यपातळीवरील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठकीच्यावेळी अनेक नेत्यांनी स्वबळावर विधानसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली. त्या पाश्र्वभूमीवर विदर्भात शिवसेनेचे संघटनात्मक काम कमी असले तरी त्यांच्या कार्यकर्त्यांनी वेळ आल्यास स्वबळावर लढण्याची मानसिकता तयार केली आहे. विदर्भात शिवसेनेजवळ युवा कार्यकर्त्यांंची मोठी फौज आहे. विदर्भात विचार केला पश्चिम विदर्भात वाशीम, अमरावती, बुलढाणा या लोकसभा मतदारसंघात चांगली ताकद आहे. पूर्व विदर्भातील रामटेक, भंडारा, गोंदिया, राजुरा, आरमोरी, भ्रदावती, हिंगणा या भागात शिवसेनेचे संघटनात्मक काम बऱ्यापैकी आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत विदर्भात ६२ पैकी ३९ ठिकाणी भाजप उमेदवार तर उरललेल्या जागी शिवसेनेचे उमेदवार निवडणूक लढले होते. त्यापैकी भाजपला १९ जागा तर शिवसेनेला फारसे यश मिळाले नव्हते.
राज्यात शिवसेना हा मोठा भाऊ आणि भाजप लहान भाऊ म्हणून आजपर्यंत भूमिका वठवित आला असताना आता मात्र लोकसभेमध्ये मिळालेल्या यशानंतर भाजपचा आत्मविश्वास वाढला असून यांनी स्वबळावर निवडणूक लढण्याची भाषा सुरू करून जागा वाटपावरून शिवसेनेवर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या संदर्भात शिवसेनेचे पूर्व विदर्भाचे जिल्हा प्रमुख शेखर सावरबांधे म्हणाले, भाजपने स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला तर आमच्या कार्यकत्यार्ंची तशी तयारी आहे. राज्यात शिवसेना आणि केंद्रात भाजप असेच समीकरण असल्यामुळे शिवसेना वरचढ होऊ नये म्हणून भाजपचा हा प्रयत्न आहे. युतीमधील दोन्ही पक्षातील नेत्यांनी एकत्र बसून जागांसंदर्भात भूमिका निश्चित केली तर हा वाद सुटू शकेल अन्यथा शिवसेना आपणहून युती तोडणार नाही. हिंदूत्वाच्या मुद्यावर दोन्ही पक्ष एकत्र आलेले असताना एका झटक्यात युती तोडणे शक्य नाही. मात्र, तसे झालेच शिवसेना स्वबळावर लढण्यास तयार होईल आणि त्या संदर्भातील पक्षातील वरिष्ठ नेते भूमिका निश्चित करतील. गेल्या विधानसभा निवडणुकीत पूर्व विदर्भात दक्षिण नागपूर, काटोल, रामटेक, भंडारा, गोंदिया, आरमोरी, राजुरा, भद्रावती, हिंगणा व वर्धा या जागा होत्या. त्यातील हिंगणा भाजपला दिली होती. यावेळी युती कायम राहिली तर शिवसेनेची विदर्भातील ताकद बघता आहे त्या जागा मिळाव्या आणि आणखी काही जागांची मागणी होऊ शकते. दक्षिण नागपूर मतदारसंघ शिवसेनेकडे असल्यामुळे तो आम्ही सोडायला तयार नाही. गेल्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार किशोर कुमेरिया यांचा पराभव झाला होता. त्यामुळे यावेळी ही जागा मिळविण्यासाठी भाजपचे काही नेते प्रयत्नशील असून त्यांनी काम सुरू केले असले तरी शिवसेना मात्र ही जागा सोडणार तयार नाही. उलट नागपूरमध्ये आणखी एक जागा मिळावी, असा आमचा प्रयत्न राहणार असल्याचे सावरबांधे यांनी स्पष्ट केले.
‘तर शिवसेना विदर्भात स्वबळावर लढेल’
लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या यशानंतर कार्यकर्ते आणि काही पदाधिकाऱ्यांनी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याची मनिषा व्यक्त केली असताना युतीमध्ये तसा निर्णय झाला
First published on: 05-07-2014 at 03:41 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Then shiv sena contest assembly election in vidarbha alone