एप्रिलच्या दुसऱ्या आठवडय़ापर्यंत पाठय़पुस्तके बाजारात उपलब्ध झाली नाहीत तर दहावीबरोबरच ‘राष्ट्रीय प्रज्ञा शोध’ (एनटीएस), ‘किशोर वैज्ञानिक प्रोत्साहनपर योजना’ आदी स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे अभ्यासाचे नियोजन कोसळण्याची भीती विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांकडून व्यक्त होते आहे.
विज्ञान आणि गणित विषय वगळता दहावीच्या सामाजिक शास्त्रे, भाषा आदी सर्व विषयांच्या अभ्यासक्रमात २०१३-१४ या शैक्षणिक वर्षांपासून आमूलाग्र बदल होणार आहेत. पण, सुधारीत अभ्यासक्रमाला अद्याप राज्य शिक्षण मंडळाची मान्यता न मिळाल्याने दहावीची पाठय़पुस्तके छापून तयार होऊन बाजारात येण्यासाठी महिनाभराचा अवधी लागणार आहे. पुस्तके एप्रिलच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवडय़ात उपलब्ध होतील, असे ‘महाराष्ट्र राज्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा’चे म्हणणे आहे. भाषा किंवा सामाजिक शास्त्रांमध्ये कच्चे असलेले विद्यार्थी नववीची परीक्षा संपल्यानंतर लगेचच या विषयांच्या अभ्यासाला सुरूवात करतात. पण, एप्रिलपर्यंत पाठय़पुस्तके बाजारात उपलब्ध झाली नाहीत तर विद्यार्थ्यांचे वर्षभराचे अभ्यासाचे नियोजन कोसळण्याची भीती आहे.
..तर नियोजन कोसळेल
‘सुट्टीकाळात विद्यार्थी फक्त गणित आणि विज्ञान विषयाच्या अभ्यासावर भर देतात हा समज चुकीचा आहे. सुट्टीत सामाजिक शास्त्रे आणि भाषा विषयांच्या अभ्यासक्रमातील तब्बल ४० टक्के भाग विद्यार्थ्यांनी अभ्यासलेला असतो. त्यामुळे पुस्तके एप्रिलच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवडय़ात आली नाहीत तर विद्यार्थ्यांचे अभ्यासाचे नियोजन कोसळून त्यांचा गुणवत्तेवर परिणाम होईल,’ अशी भीती दादरच्या ‘बालमोहन विद्या मंदिर’ शाळेचे शिक्षक विलास परब यांनी व्यक्त केली.
अभ्यासाची गाडी कशी हाकायची
‘जे विद्यार्थी भाषा किंवा सामाजिक शास्त्रात कच्चे असतात ते सुट्टीचा उपयोग या विषयांच्या अभ्यासावर भर देऊन करतात. माझ्या मुलाचे इंग्रजी, संस्कृत, हिंदी हे विषय कच्चे आहेत. सुट्टीत मला या विषयांची तयारी त्यांच्याकडून करवून घ्यायची होती. पण पुस्तकांचा ‘रोडमॅप’च नसेल तर विद्यार्थ्यांनी अभ्यासाची गाडी कशी हाकायची,’ असा सवाल राजेद्र वस्ते या पालकांनी केला.
खासगी संस्थांकडे
पुस्तके छापून तयार?
राज्य शिक्षण मंडळाची पाठय़पुस्तके तयार नसली तरी काही बडय़ा प्रकाशन संस्थांची सुधारित अभ्यासक्रमानुसार गाईड्स, प्रश्नावली आदी मार्गदर्शन पुस्तके छापून तयार आहेत, अशी चर्चा आहे. काही बडे कोचिंग क्लासेसही यात मागे नाहीत. अधिकृत पुस्तके तयार नसताना खासगी संस्थांना अभ्यासक्रमाचा तपशील उपलब्ध होतो कसा असा प्रश्न आहे. अधिकृत पुस्तके बाजारात येण्याचा अवकाश खासगी संस्थांची पुस्तकेही बाजारात आलीच म्हणून समजा, अशी प्रतिक्रिया एका शिक्षकाने दिली. सुधारित अभ्यासक्रम खासगी संस्थांकडे फोडण्यात अभ्यासक्रम तयार करणाऱ्या शिक्षकांपासून डीटीपी ऑपरेटर्स या निर्मितीच्या प्रक्रियेतील कोणाचाही समोवश असू शकतो. या साखळीतील कच्चे दुवे हेरून सुधारित अभ्यासक्रम मिळविला जातो, अशी चर्चा आहे.
स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासावरही परिणाम
‘राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा’ ही आता आठवीऐवजी दहावीकरिता घेण्यात येते. या आणि ‘किशोर वैज्ञानिक प्रोत्साहनपर योजने’अंतर्गत होणाऱ्या परीक्षांची तयारीही विद्यार्थी सुट्टीकाळात करत असतात. ‘प्रज्ञा शोध परीक्षे’चा पहिला टप्पा तर नोव्हेंबरमध्येच पार पडतो. त्यामुळे, शाळा सुरू होण्याआधीचा सुट्टीचा बहुतांश वेळ आम्ही या परीक्षेच्या तयारीत घालवतो. पण, पुस्तके उशीरा आली दहावीच्या अभ्यासाबरोबरच या स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासावरही परिणाम होण्याची शक्यता आहे,’ अशी भीती दापोलीच्या ‘ए. जे. हायस्कुल’चा नववीचा विद्यार्थी सिद्धेश मेहता याने व्यक्त केली. पुस्तके हातात असतील तर अभ्यासाची दिशा स्पष्ट होण्यास मदत होते. पण पुस्तकांविना सुट्टीतील आमचा बराचसा वेळ वाया जाणार आहे, अशी प्रतिक्रिया त्याने व्यक्त केली.