राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहराध्यक्षाचा
पोलीस ठाण्यात धुडगूस
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष छबु नागरेने सोमवारी रात्री अंबड पोलीस ठाण्यात धुडगूस घालून कर्मचाऱ्यांना दमदाटी केल्याचा प्रकार पुढे आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना त्रास दिल्यास नाशिकमध्ये नोकरी करु दिली जाणार नाही, अशी दमदाटी छबु नागरेने केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मुजोरीच्या या प्रकाराने पोलीस दलात संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे.
गृहखाते राष्ट्रवादीकडे असल्याने या पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या दबावाचा सामना करावा लागत असल्याची स्थानिक पोलिसांची भावना असताना आता या पदाधिकाऱ्यांची मजल थेट पोलीस ठाण्यात धुडगूस घालण्यापर्यंत गेल्याने कर्मचारी संतप्त झाले आहेत.
पाच दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आ. अपूर्व हिरे यांच्या कार्यालयाची तोडफोड केली होती. या प्रकरणी अटकेत असणाऱ्या संशयितांच्या पोलीस कोठडीत आणखी वाढ करण्यात आली. सोमवारी रात्री दहाच्या सुमारास छबु नागरेचे अंबड पोलीस ठाण्यात आगमन झाले. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची पोलीस कोठडी का वाढवून घेतली तसेच कोठडीतील कार्यकर्त्यांना बाहेरून खाद्य पदार्थ का दिले जाऊ देत नाही असा प्रश्न करत नागरेने उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांशी वाद घालण्यास सुरूवात केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना त्रास दिल्यास तुमची नोकरी नाशिकमध्ये होणार नाही अशी धमकीही नागरेने दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. यावेळी छबु नागरेने आरडाओरड केला.
प्लास्टिकच्या खुच्र्याना लाथा मारल्या. टेबलावर आदळआपट केली. जवळपास दहा ते पंधरा मिनिटे त्याचा पोलीस ठाण्यात धुडगूस सुरू होता. उपस्थितांना मोठय़ा आवाजात धमकावत तो पोलीस ठाण्यातून निघून गेला. या घटनाक्रमानंतर महिला पोलीस अधिकाऱ्यांनी वरिष्ठांशी संपर्क साधून झाल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक धनश्री पाटील यांनी नागरेविरुद्ध तक्रार दिली.
सरकारी कामकाजात अडथळा आणणे, पोलीस ठाण्यात दमदाटी व आरडाओरड करणे, खुच्र्याची फेकाफेक करणे आदी कारणांवरुन नागरेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अद्वय हिरे यांच्या कोठडीत वाढ
राष्ट्रवादीच्या नेत्यांबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह लिखाण केल्या प्रकरणी नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष अद्वय हिरे यांच्या पोलीस कोठडीची मुदत आणखी एक दिवसाने वाढविण्यात आली आहे. या कारणावरून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आ. अपूर्व हिरे यांच्या कार्यालयाची तोडफोड केली होती. त्या प्रकरणी अटकेत असणारे राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही पोलीस
कोठडीत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा