शासन स्थानिक संस्था कर रद्द करीत नाही तोपर्यंत व्यापाऱ्यांचे आंदोलन सुरूच राहणार असून शासनाने दबावतंत्राचा वापर केल्यास व्यापारी नागरी बेशिस्त चळवळ हाती घेतील आणि कुठलाही कर भरणार नाही, असा इशारा नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सने दिला.
आजपासून शासनाने स्थानिक संस्था कराची अंमलबजावणी राज्यात सुरू केली. त्या विरोधात आज व्यापाऱ्यांनी बंद पुकारला. त्यास शंभर टक्के प्रतिसाद मिळाल्याचा दावा नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष दीपेन अग्रवाल यांनी केला. शहरातील प्रत्येक दुकान आज बंद होते. शासनाने नवा स्थानिक संस्था कर आणला. त्यामुळे पुन्हा ‘इन्स्पेक्टर राज’ सुरू होईल आणि भ्रष्टाचार व काळाबाजार वाढेल. दुकाने बंद असल्याने आज शहरात सुमारे ५०० कोटी रुपयांचा व्यवसाय ठप्प पडला. सत्तर हजार कामगार व अडीच लाख व्यापारी बंदमध्ये सहभागी होते. शासनाने स्थानिक संस्था कर रद्द करून जकात कर पुन्हा सुरू करावा. कुणीही व्यापारी स्थानिक संस्था करानुसार नोंदणी करणार नाही. महापालिकेने यासंदर्भात नोटिसा पाठवून दबाव तंत्राचा वापर केल्यास नागरी बेशिस्त चळवळ व्यापारी हाती घेतील. त्यानुसार व्हॅटसह कुठलाच कर व्यापारी भरणार नाहीत, असा इशारा अग्रवाल यांनी दिला. शासनाने नव्या कराची आकारणी पत्रक अद्यापही व्यापाऱ्यांना दिलेले नाही. काही वस्तूंचे भाव कमी होणार असून महापालिकेचे उत्पन्न वढेल व नागरिकांना दिलासा मिळेल, असे शासनातर्फे सांगण्यात येत असले तरी हा भ्रम आहे. प्रारंभी भाव कमी करून नंतर थोडय़ा थोडय़ा प्रमाणात भाव वाढविले जातील.
शासन नागरिकांच्या डोळ्याच धूळफेक करीत आहे. स्थानिक संस्था करविरोधात याचिका सादर करण्यात आली असून उद्या त्यावर सुनावणी होणार आहे.
व्यापाऱ्यांनी शहरात मिरवणुका काढून बंदचे आवाहन केले. त्यानंतर नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सच्या सिव्हिल लाईन्समधील कार्यालयाच्या प्रांगणात सभा झाली. हजारो व्यापारी सभेला उपस्थित होते.
सीताबर्डी र्मचट्स असोसिएशन, नागपूर चिल्लर किरणा व्यापारी संघ, स्टोन र्मचट असोसिएशन आदींसह विविध व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींची भाषणे झाली. नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे सचिव हेमंत गांधी तसेच नीलेश सूचक, प्रकाश मेहाडिया, सचिन पुनियानी, अजय मदान, संजय अग्रवाल, राधेश्याम सारडा, लक्ष्मीनारायण शर्मा आदींसह अनेक जण याप्रसंगी उपस्थित होते.
..तर कर भरणार नाही
शासन स्थानिक संस्था कर रद्द करीत नाही तोपर्यंत व्यापाऱ्यांचे आंदोलन सुरूच राहणार असून शासनाने दबावतंत्राचा वापर केल्यास व्यापारी नागरी बेशिस्त चळवळ हाती घेतील आणि कुठलाही कर भरणार नाही, असा इशारा नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सने दिला.
First published on: 02-04-2013 at 02:51 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Then will not pay the taxsays the businessmans