ऊसदराच्या मागणीसाठी रास्तारोको आंदोलन करणाऱ्यांना शेतक ऱ्यांना पांगविण्यासाठी गुरुवारी कूर (ता. भुदरगड) येथे पोलिसांनी हवेत गोळीबार केला. तर काल सांगली जिल्ह्य़ातील आष्टा येथे पोलिसांनी केलेल्या गोळीबारामध्ये एक शेतकरी जखमी झाला. गेल्या दोन दिवसांमध्ये शेतक ऱ्यांची आंदोलने कायम असली तरी त्याचा जोर बऱ्याच प्रमाणात कमी झाला आहे. यामुळे महालक्ष्मी पूजन व दीपावली पाडवा साजरा न करता आलेल्या अनेकांना भाऊबीज मात्र कुटुंबीयांसमवेत साजरी करण्याची संधी मिळाली.
उसाला ३ हजार रुपये पहिली उचल मिळावी या मागणीसाठी कोल्हापूर व सांगली येथे शेतक ऱ्यांची आंदोलने सुरूच आहेत. गुरुवारी भुदरगड तालुक्यातील कूर येथे शेतक ऱ्यांनी रास्ता रोको केला. या आंदोलनात स्वाभिमानी संघटनेचे कार्यकर्ते व शेतकरी मोठय़ा संख्येने जमले होते. आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी आंदोलकांना आंदोलन थांबविण्याची सूचना केली. त्याकडे दुर्लक्ष करून घोषणाबाजी सुरूच राहिली. त्यामुळे पोलिसांनी लाठीमार सुरू केला. तर जमावाकडून पोलिसांच्या दिशेने दगडफेक होऊ लागली. पोलिसांनी जमावाला आटोक्यात आणण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांडय़ा फोडल्या. तरीही आंदोलक दगडफेक करीत राहिले. अखेरीस जमावाला काबूत आणण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला. गोळीबार सुरूच होताच मात्र जमाव दिसेल त्या दिशेने धावत सुटला. त्यानंतर या भागात दिवसभर तणावपूर्ण शांतता होती.    
दरम्यान काल बुधवारी कोल्हापूर जिल्ह्य़ातील अनेक भागांत आंदोलनाच्या वेळी हिंसक घटना घडल्या. दिंडनेर्ली, येती, कुये, निगवे आदी गावांत आंदोलनाचा वेग जोरात होता. रस्त्यांवर झाडी टाकून व टायर पेटवून टाकण्याचे प्रकार सुरू होते. परिणामी या मार्गावरून वाहतूक बंद झाली होती. पोलीस एका ठिकाणी जावून आंदोलनाचा अडथळा दूर करीत असताना शेतकरी तेथून काही अंतरावर जाऊन पुन्हा टायर पेटवून टाकण्याचे व झाडे तोडून टाकण्याचा प्रयत्न करीत होता. या आंदोलकांच्या या कृत्यामुळे पोलीसही चिडले होते.
 दिंडनेर्ली येथे जमावाने पोलिसांवर जोरदार दगडफेक करताना त्यांची गाडीही पेटवून दिली. त्यावर जमावाला काबूत आणण्यासाठी पोलिसांनी बेदम लाठीमार हल्ला केला. रस्त्यात व शेतात एकेकटय़ाला गाठून लाठीचा चोप दिला जात होता. यामध्ये बरेच आंदोलक जखमी झाले. या प्रकरणी पोलिसांनी गुरुवारी सीत जणांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान सांगली जिल्ह्य़ातही शेतकरी संघटनेचे आंदोलन गेले दोन दिवस कायम राहिले. बुधवारीआष्टा येथे शेतक ऱ्यांनी रास्ता रोको केला. रस्त्यांवर टायरी पेटवून टाकल्याने वाहनधारकांची पंचायत झाली होती. परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. जमावाने केलेल्या दगडफेकीत गाडीच्या सर्व काचा फुटल्या होत्या. जमाव बेभानपणे दगडफेक करीत राहिल्याने पोलिसांनी लाठीमार सुरू केला. जमाव व पोलिसांच्यात समोरासमोर जणू युद्धच सुरू झाले. पोलिसांनी जमावाला काबूत आणण्यासाठी हवेत गोळीबार केला. यामध्ये प्रवीण पाटील हा शेतकरी जखमी झाला.     
भाजपाचे नेते एकनाथराव खडसे यांनी गोळीबारात ठार झालेल्या चंद्रकांत नलवडे याच्या कुटुंबीयांची गुरुवारी भेट घेतली. भाजपाच्या वतीने नलावडे कुटुंबीयांना १ लाख रुपयांची मदत देण्यात आले. नलावडे यांच्या दोन्ही मुलांच्या शिक्षणाचा खर्चही भाजपाच्या वतीने उचलण्यात येणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले. नलावडे यांच्यावर झालेल्या गोळीबाराबद्दल खडसे यांनी संशय व्यक्त केला. नलावडे याच्या अंगावर पाच जखमा होत्या. त्यातील दोन बंदुकीच्या गोळ्यांच्या होत्या. तर उर्वरित तीन कशाच्या होत्या याची निवृत्त न्यायाधीशाकरवी चौकशी होऊन वस्तुस्थिती उजेडात यावी, अशी मागणी त्यांनी केली. सरकारच्या आदेशावरूनच हा गोळीबार झाला आहे. सत्तेतील नेते मंडळी भलतेसलते बोलून आंदोलन पेटवत आहेत. शासनाने या प्रकरणी मौन सोडून चर्चेची भूमिका घ्यावी, अशी मागणीही खडसे यांनी केली.

Story img Loader