शहरात अजूनही ४०० मीटरचा धावमार्ग उपलब्ध नसताना येथील खेळाडू आंतरराष्ट्रीय पदक जिंकत आहेत. असा धावमार्ग शहरात लवकर तयार करून सर्व खेळाडूंना शहरातील मैदाने उपलब्ध होणे आवश्यक आहे, असे मत शिवछत्रपती क्रीडा जीवनगौरव पुरस्कारप्राप्त मानसोपचारतज्ज्ञ भिष्मराज बाम यांनी व्यक्त केले. खेळाडूंच्या मागे सर्वानी उभे राहून हवी ती मदत केल्यास नाशिकचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर नक्कीच अधिक दुमदुमेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
बाम यांच्यासह शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारप्राप्त अशोक दुधारे, आनंद खरे, अजिंक्य दुधारे, स्नेहल विधाते, वैशाली तांबे, तुषार माळोदे यांना येथील श्री साईबाबा हार्ट इन्स्टिटय़ूटतर्फे गौरविण्यात आले. त्यावेळी बाम बोलत होते. सर्वाना शरद आहेर, शर्वरी लथ, डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, डॉ. पल्लवी धर्माधिकारी यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह, पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देण्यात आले. याप्रसंगी आहेर यांनी खेळाडूंना प्रोत्साहित करण्याची गरज व्यक्त केली. नाशिक ही क्रीडा क्षेत्रातील हिऱ्यांची खाण आहे. या हिऱ्यांना पैलू पाडण्याचे काम यापुढे सर्वानी मिळून करावयास हवे, असे त्यांनी सांगितले. डॉ. धर्माधिकारी यांनी भविष्यात खेळाडूंना लागणारी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. यावेळी अश्पाक शेख हेही उपस्थित होते.

Story img Loader