मुंबई, ठाण्यापाठोपाठ नवी मुंबईतही दरवर्षी दहीहंडय़ा बांधण्याचे प्रमाण वाढत असून लोकसभा तोंडावर आल्याने यंदा राजकीय पक्षांसाठी दहीहंडी हे जनसंर्पकाचे उत्तम साधन असल्याने दहीहंडय़ांची संख्या २३३ पर्यंत गेली आहे. दहीहंडय़ा बांधण्याची जणू काही अहमहमिका लागली असून त्यासाठी लागणारे मंडप, कमानी यासाठी रस्ते सर्रास खोदले जात असल्याचे दिसून येते. दरम्यान, पालिकेच्या वतीने या मंडळावर कारवाई करणारी एकही तक्रार पोलीस ठाण्यात आजमितीस येत नसल्याने नवी मुंबईतील कोणत्याही पोलीस ठाण्यात खड्डे खोदाईबद्दल एकही तक्रार यापूर्वी दाखल नसल्याचे समजते.
गुरुवारी होणाऱ्या दहीहंडी महोत्सवाकडे सध्या एक इव्हेन्ट म्हणून पाहिले जात असून यात राजकीय पक्ष आघाडीवर आहेत. नवी मुंबईत दहीहंडी उत्सवाचे प्रमाण मागील पाच वर्षांत बऱ्यापैकी वाढल्याचे दिसून येते. ऐरोली ते पनवेल या परिसरांत यावर्षी २३३ दहीहंडय़ा बांधल्या जाणार असून या दहीहंडीसाठी पोलिसांची परवानगी घेण्यात आली आहे. याशिवाय छोटय़ा मोठय़ा १५० दहीहंडय़ा विनापरवानगी बांधल्या जात आहेत. ज्या दहीहंडीला ध्वनिक्षेपकांची गरज पडते त्याच ठिकाणी पोलिसांची परवानगी घेतली जात असल्याचे दिसून येते. मोठय़ा दहींहडय़ांसाठी भरघोस बक्षीस, सन्मान चिन्ह, मंडप, डीजे, पाण्याचे टँकर यांची व्यवस्था करण्यात आली असून जाहिरात व कमानी यांसाठी लाखो रुपये खर्च करण्यात येत आहेत. मंडप आणि कमानींसाठी रस्ते मधोमध खोदले जात असून त्यासाठी वाहतूक पोलिसांची वेगळी परवानगी घेतली जात नसल्याचे एका पालिका उपायुक्ताने सांगितले. पोलिसांची परवानगी असल्याशिवाय मंडपांना व कमानींना परवानगी देऊ नका असे आदेश उपायुक्त जगन्नाथ सिन्नरकर यांनी सोमवारी प्रभाग अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिल्याचे समजते.
नवी मुंबईत आजमितीस एकाही प्रभाग अधिकाऱ्याने रस्त्यात खोदलेल्या खड्डय़ांबद्दल पोलीस ठाण्यात लेखी तक्रार केल्याची नोंद नाही. प्रत्येक दहीहंडी मंडळ एखाद्या राजकीय पक्षाच्या वरदहस्ताखाली चालत असल्याने हे प्रभाग अधिकारी लेखी तक्रार करण्यास धजावत नसल्याचे समजते. त्यामुळे नवी मुंबईत दहीहंडी व गणेशोत्सव मंडळासाठी मंडप व कमानी उभारण्यासाठी रस्ते म्हणजे ‘आवो जावो रस्ता तुम्हारा’ असल्याने ठिकठिकाणी कमानी उभारण्यात आलेल्या आहेत. वाशी, नेरुळ, नवीन पनवेल, खारघर या ठिकाणी दहीहंडी उभारण्याचे प्रमाण जास्त आहे. वाशीत एकूण आठ दहीहंडय़ा उभारल्या जाणार असून नेरुळमध्ये हे प्रमाण (१८) सर्वाधिक आहे. त्यासाठी मंडळाने दहीहंडीच्या चारही बाजूने कमानी उभारल्या असून भव्य मंडप टाकण्यात आले आहेत. पोलीस या दहीहंडय़ांना परवानगी देताना वाहतुकीची कोंडी, रस्त्याची अडवणूक यांचा अहवाल प्रत्यक्ष ठिकाणी न जाता देत असल्याने या मंडळाचे चांगलेच फावले आहे. एक दिवसाच्या उत्सवासाठी नवी मुंबईत ५५ ठिकाणी कमानी उभारण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे वाहन हाकताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे दृश्य आहे.

Story img Loader