* सीसी टीव्ही कॅमेरे प्रकल्प रखडला
* यूजीसीचा निधी बंद झाल्याने पैशाची वानवा
एकतर्फी प्रेमातून होणारे हल्ले वा भांडणे टाळण्यासाठी आमच्या महाविद्यालयात महिला विकास विभाग, शिस्त समिती, विद्यार्थी परिषद यांच्या माध्यमातून प्रयत्न केले जातात.
डॉ. बी. जी. पगारे, प्राचार्य, सिद्घार्थ महाविद्यालय.
चेतना महाविद्यालयात घडलेला दुर्दैवी प्रसंग टाळण्यासाठी महाविद्यालयांनी आपल्या परिसरात सीसी टीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी सूचना मुंबई विद्यापीठाने केली असली तरी या महागडय़ा योजनेसाठी पसा आणायचा कुठून, असा प्रश्न महाविद्यालयांना पडला आहे.
 बहुतांश महाविद्यालयांनी खासगी सुरक्षारक्षक नेमले असून, विद्यार्थ्यांना ओळखपत्राशिवाय प्रवेश दिला जात नाही. मात्र महाविद्यालयाच्या आवाराबाहेरील सुरक्षा व्यवस्था रामभरोसे असल्याचेच आढळून येत आहे.
चार वर्षांपूर्वी मुंबईवर झालेल्या दशहशतवादी हल्ल्यानंतर काही बडय़ा महाविद्यालयांनी सुरक्षेसाठी बाहेरून सुरक्षारक्षक नेमण्यापासून सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यापर्यंतचे अनेक उपाय योजले. या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबरोबरच चोरी, एकतर्फी प्रेमातून होणारे अतिप्रसंग आदी गरप्रकारांवर नजर ठेवणे महाविद्यालय व्यवस्थापनाला शक्य झाले. मुंबई विद्यापीठानेही महाविद्यालयांना आपल्या परिसरात सीसी टीव्ही बसविण्यास प्राधान्य देण्याची सूचना केली आहे, परंतु सर्वच महाविद्यालयांना ही योजना अमलात आणणे शक्य झालेले नाही. सीसी टीव्हीसारख्या महागडय़ा प्रकल्पाला विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) निधी देणे बंद केले आहे. महाविद्यालयांना निधी देताना हा पसा सीसी टीव्ही कॅमेऱ्यांसाठी वापरण्यात येऊ नये, अशी स्पष्ट अट यूजीसीने घातल्याने अनेक महाविद्यालयांना अन्य मार्गातून सुरक्षेसाठीचा निधी उभा करावा लागणार आहे. सरकारकडून मिळणारा निधी मर्यादित असल्याने इतका पसा आणायचा कुठून, असा प्रश्न महाविद्यालयांसमोर उभा राहिला आहे.
दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचे पुढील लक्ष्य शाळा-महाविद्यालये असतील, असा इशारा गृह विभागाकडून देण्यात आला. त्यामुळे सतर्क होत अनेक महाविद्यालयांनी आपल्या परिसरात सीसी टीव्ही कॅमेरे लावण्यापासून बाहेरून सुरक्षारक्षक नेमण्यासारखे अनेक उपाय योजले. सरकारचे अनुदान कमी असल्याने महाविद्यालयांना कायमस्वरूपी सुरक्षारक्षकांची नियुक्ती करता येत नाही, म्हणून पाल्र्याच्या डहाणूकरसारख्या महाविद्यालयांनी बाहेरून सुरक्षारक्षक नेमून सुरक्षा व्यवस्था मजबूत केली आहे. या कॅमेऱ्याच्या परिसरात तब्बल १५६ सीसी टीव्ही कॅमेरे आहेत. यामुळे अनेक गरप्रकारांना आळा घालणे शक्य झाले, असे महाविद्यालयाच्या प्राचार्य माधवी पेठे सांगतात.
चर्चगेटच्या सिद्धार्थ महाविद्यालयाला मात्र आपली योजना गुंडाळून ठेवावी लागणार आहे. कारण यूजीसीने सीसी टीव्ही कॅमेऱ्यांसाठी निधी उपलब्ध करून देण्यास नकार दिल्याने ही योजना अमलात आणण्यासाठी लागणारा तीन ते चार लाखांचा निधी कुठून आणायचा, असा प्रश्न या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. जी. पगारे यांना आहे.
यूजीसीचा निधी शैक्षणिक योजनांसाठीच वापरणे अभिप्रेत आहे, परंतु मधल्या काळात महाविद्यालयांनी हा निधी सीसी टीव्हीसारख्या महागडय़ा योजनांवर खर्च केल्याचे यूजीसीच्या लक्षात आल्याने ही अट टाकण्यात आली. अर्थात चेतना महाविद्यालयातील दुर्दैवी प्रकारासारख्या घटना रोखण्यात कॅमेऱ्यांची किती मदत होते, हा प्रश्नच असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.     
कॅमेऱ्यांमुळे आपल्यावर सतत कुणाची नजर आहे हा धाक विद्यार्थ्यांना असतो. पण एकतर्फी प्रेमातून किंवा विद्यार्थ्यांमध्ये अचानक उद्भवणारी भांडणे रोखण्यास याचा किती उपयोग होईल? या प्रकारच्या घटना टाळण्यासाठी महाविद्यालयांमध्ये समुपदेशनाची योग्य सोय उपलब्ध असायला हवी. जेणेकरून मनाच्या असंतुलित अवस्थेत मुलींना किंवा मुलांना योग्य वेळी त्यातून बाहेर काढता येईल
माधवी पेठे, प्राचार्य, डहाणूकर महाविद्यालय, पार्ले. 

Story img Loader