* महसूलमंत्र्यांकडे कार्यकर्त्यांची तक्रार
*  खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धा

नगरमध्ये पुढील महिन्यात शहरात होणाऱ्या राज्य सरकारच्या स्व. खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेच्या आयोजनाभोवती राष्ट्रवादी व काँग्रेस यांच्यातील राजकीय वादाची झालर विणली जाऊ लागली आहे. स्पर्धेच्या आयोजन व संयोजन समितीतून काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादीचे पालकमंत्री बबनराव पाचपुते यांनी डवलल्याची तक्रार काँग्रेसने महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे केल्याचे समजले.
थोरात यांनीही हे चुकीचे घडत आहे, असे सांगत याबाबत लक्ष घालण्याचे मान्य केले. काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने स्व. खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धा नगरला घेण्याचे जाहीर केले. त्याचवेळी काँग्रेसकडून थोरात यांचे भाचे व जिल्हा परिषद सदस्य सत्यजित तांबे यांची स्वागताध्यक्षपदी नियुक्ती केल्याचे जाहीर करण्यात आले होते. स्वागताध्यक्षपदी तांबे यांची नियुक्ती झाल्याचे आपल्याला माहिती नाही, असे सांगत पालकमंत्री पाचपुते यांनी आयोजन समितीच्या बैठकीत आपले चिरंजीव व परिक्रमा शिक्षण संस्थेचे सचिव विक्रमसिंह पाचपुते यांची नियुक्ती केल्याचे जाहीर केले. काँग्रेसवर ही एक प्रकारची कुरघोडीच केल्याचे मानले जाते.
या कुरघोडीने काँग्रेसच्या थोरात गटात अस्वस्थता निर्माण झाली. महसूलमंत्री थोरात आज कर्जतच्या कार्यक्रमासाठी जात असताना सकाळी त्यांनी काँग्रेसच्या शहरातील पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांची सरकारी विश्रामगृहावर भेट घेतली. त्यावेळी काँग्रेसने संयोजन व आयोजनातून पालकमंत्र्यांनी डावलल्याच्या तक्रारी केल्या. तांबे यांनी क्रीडामंत्री पद्माकर वळवी यांच्याकडे पाठपुरावा करुन नगरमध्ये स्पर्धा आयोजित करण्यास मान्यता मिळवली. परंतु पालकमंत्री कुरघोडी करत आहेत, स्पर्धेसाठी काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना निमंत्रण पाठवले जाते, मात्र आयोजन व संयोजन समितीत कोठेही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना स्थान दिले नाही. समित्या स्थापन करताना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले नाही, वाडिया पार्क क्रीडा संकुलाचा प्रश्न थोरात यांच्या माध्यमातून मार्गी लावण्यासाठी पक्षाचे पदाधिकारी प्रयत्न करतात, तेथेच ही स्पर्धा घेतली जात आहे, तरीही विश्वासात घेतले जात नाही, याकडे नगरसेवक धनंजय जाधव, अनंत देसाई, भास्करराव डिक्कर, अभिजित लुणिया, बाळासाहेब सराईकर आदींनी लक्ष वेधले.
नगरसेवक जाधव संयोजन समितीत आहेत, मात्र ते जिल्हा तालीम संघाचे खजिनदार असल्याने त्यांना स्थान मिळाले आहे, असेही स्पष्टीकरण थोरात यांना देण्यात आले. थोरात यांनी दखल घेण्याचे मान्य केले, असे समजले.