नाटक करतोय, चला जाहिरात क्षेत्रात काय होतंय का हे पाहूया, असे म्हणत जयंत गाडेकर यांनी जाहिरात क्षेत्रात प्रवेश केला. पहिल्याच जाहिरातीने जयंत गाडेकर यांचा चेहरा घराघरात पोहोचला ती जाहिरात होती एअरटेलची. अब हर कोई ले सकता है, या कॅचलाइनने जयंत गाडेकर यांनी स्वत:चे स्थान या क्षेत्रात निर्माण केले.
चंद्रपूरहून मुंबईला केवळ सिनेक्षेत्रात काम करायला मिळेल या आशेने पाऊल ठेवले होते. पण इथे आल्यावर परिस्थिती वाटत होती तितकी सोपी नव्हती. मी सर्वप्रथम या क्षेत्रात येण्यासाठी शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतले. त्यानंतर खऱ्या अर्थाने मी या क्षेत्राची वाट धरली. विनोदाचा सेन्स उत्तम आहे, असं मित्रमंडळींमध्ये सतत ऐकायला मिळायचं. नाटकातील कामामुळेही विनोदी कलाकार म्हणून माझी ओळख सर्वदूर झाली होती. मग मी म्हटलं आपण एक वेगळं क्षेत्र म्हणून जाहिरात क्षेत्रात स्वत:ला आजमावून पाहूया. नाटय़क्षेत्रात काम उत्तम सुरू असतानाही मी या नव्या क्षेत्रात प्रवेश करण्याचं ठरवलं. सुरुवातीला देण्यात येणाऱ्या ऑडिशन्स आणि त्यातून पुढे असणाऱ्या निवड पद्धतीच्या चाचण्या देणं हे सुरूच होतं. एकदा आपण ऑडिशन दिली म्हणजे आता आपली निवड होईल, आपल्याला काम मिळेल, असं सर्वानाच वाटत असतं. तसंच मलाही वाटत होतं, परंतु इथे वाट पाहणं म्हणजे माणसाचा कडेलोट होतो. शेवटपर्यंत थांबवलं जातं आणि ते काम आपल्याला मिळतही नाही.जाहिरात क्षेत्रात एकदा प्रवेश केला आणि काम मिळालं, असं होत नाही. उत्पादनाची गरज काय आहे, यावरच तुमची निवड अवलंबून असते. त्यामुळे तुम्ही कितीही चांगली ऑडिशन दिली आणि त्यात पास झालात तरीही अनेकदा नकार ऐकावा लागतो. हा नकार त्या वेळी पचवणं फार कठीण असते. आपण खूप आशेने एखादं काम मिळेल म्हणून वाट पाहत असतो आणि ते मिळत नाही. पण हाच काळ शिकण्यासाठी सर्वात योग्य असतो.
जाहिरात क्षेत्र हा ३० सेकंदांचा खेळ आहे. या खेळासाठी काही लाखो रुपये खर्च होत असतात. त्यामुळे एखाद्या पात्राची निवड करताना ते त्यांच्या उत्पादनाला साजेसेच पात्र निवडतात. त्याकरिता काही हजारोंमधून आपली निवड होत असते. मला सर्वात पहिली जाहिरात मिळाली ती एअरटेल या उत्पादनाची. या जाहिरातीमुळे माझा चेहरा घराघरात पोहोचला. परंतु त्यापुढेही मला काम मिळवण्यासाठी कष्ट करावे लागले होते. प्रत्येक ठिकाणी होकार मिळालाच असे नाही. तर अनेक ठिकाणी उत्पादनाला साजेसा चेहरा नाही म्हणून नाकारले गेले. या क्षेत्रातील निवडीची गणितं ठरलेली आहेत. त्यामुळेच इथे तुमचं काम मन लावून करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पेशन्स ठेवा. पेशन्स ठेवलात व काम उत्तम केलंत तर इथे कामाची कमतरता नाही. शिवाय इथल्या कामाचे पैसेही उत्तम मिळतात. त्यामुळे आपली आर्थिक बाजूही भक्कम होते.
जयंतचा सल्ला
कुठल्याही क्षेत्रात जा, त्या क्षेत्राची र्सवकष माहिती मिळवा. केवळ छान आहे किंवा उत्तम पैसा आहे म्हणून या क्षेत्रात येऊ नका. आधी या क्षेत्राचा पूर्णपणे अभ्यास करा, मगच या क्षेत्रात या. काम करण्याच्या संधी खूप आहेत, पण योग्य ती संधी ओळखायला शिका.
जयंतने केलेल्या जाहिराती-
एअरटेल, मंच विराट कोहलीसमवेत, एल अॅण्ड टी इन्शुरन्स, पार्ले ट्वेंटी ट्वेंटी, नोकिया.
संयम हवाच..!
नाटक करतोय, चला जाहिरात क्षेत्रात काय होतंय का हे पाहूया, असे म्हणत जयंत गाडेकर यांनी जाहिरात क्षेत्रात प्रवेश केला. पहिल्याच जाहिरातीने जयंत गाडेकर यांचा
First published on: 18-08-2013 at 01:01 IST
मराठीतील सर्व रविवार वृत्तांन्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: There should be patience