शहर पाणी पुरवठा योजना अत्यंत नाजूक झाली असून मुळा धरणावरील उपसा केंद्रात अवघ्या ५ मिनिटांसाठी वीज पुरवठा खंडीत झाला तरीही सगळ्या शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत होतो. पाणी पुरवठा विभागाच्या पत्रकातच तशी माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, बुधवार हा शहराच्या मध्यवर्ती भागाचे पाणी बंद ठेवण्याचा वार असला तरीही त्यादिवशी पाडवा असल्याने शहराचा पाणी पुरवठा सुरूच राहणार असल्याचे पाणी पुरवठा विभागाने कळवले आहे.
नोव्हेंबर ३ ते ८ तारखेपर्यंतच्या कालावधीत सकाळी किंवा दुपारी (एकाच वेळेस) खंडीत झालेल्या वीज पुरवठय़ाच्या वेळा त्यात दिल्या आहेत व त्या फक्त ५ ते १० मिनिटांपेक्षा जास्त नाहीत. पण अशी काही मिनिटे वीज केली तरीही सगळी यंत्रणा बंद पडते. मुळानगर, विळद व नागापूर येथील पंपिंग स्टेशन बंद पडून ते पुन्हा सुरळीत होण्यास तब्बल २ ते ३ तासांचा अवधी लागतो व शहरात वेळेवर पाणी देणे अवघड होते, असे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
पाणी योजना इतकी नाजूक झाली असेल तर हा विभाग करतो काय याबद्दल मात्र पत्रकात काहीही नाही. वीज वितरण कंपनीला वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याबाबत वारंवार कळवले जात आहे, मात्र तोपर्यंत नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असा सल्ला या पत्रकात पाणी पुरवठा विभागाने दिला आहे. ऐन सणासुदीच्या काळात नगरकरांवर या नाजूक झालेल्या पाणी योजनेने पाणी टंचाईची संक्रात आणली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा