डान्स बारवरील बंदी उठल्याने दहिसर चेकनाक्यापुढील मीरारोड आणि काशीमीरा हा परिसर पुन्हा गजबजणार आहे. या ठिकाणी अगदी ओळीने अनेक डान्स बार होते. बंदीमुळे काहीशा ओसाड पडलेल्या या भागातील रात्रीचा झगमगाट पुन्हा दिसणार आहे. डान्सबारसोबत पिक-अप पॉईंटमुळे लॉजेसच्या धंद्यालाही त्यामुळे पूर्वीसारखी भरभराट मिळणार आहे.
दहिसर चेकनाका सोडला की, मीरा-भाईंदर महापालिकेची हद्द सुरू होते. तेथून पुढे मुंबई-अहमदाबाद महामार्ग. पण मुंबईच्या टोकाचा हा मार्ग ओळखला जायचा तो डान्सबारसाठी. या ठिकाणी मिलेनियम, व्हाइट हाऊस, मेला, स्प्रिंग, रेड हॉर्स, नाइट मीटिंग, स्वागत, नाइट सिटी, ऑर्चिड असे पन्नासहून अधिक डान्स बार आहेत. मुंबई आणि परिसरातून इथे शेकडो बारबाला येतात. मुंबईतून दहिसर चेकनाक्यावर येऊन तेथून रिक्षाने बारमध्ये जातात. संध्याकाळनंतर हा रुक्ष भाग या बारबालांमुळे ‘नेत्रसुखद’ बनायचा. काशीमीरा, मीरा रोड आणि भाईंदरचा काही भाग हा केवळ याच डान्सबारसाठी ओळखला जातो. मुंबईबाहेर आणि महामार्गाजवळ असल्याने सर्वानाच ते सोयीचे होते. अगदी गुजरातमधून मुंबईत आलेले व्यापारी विरंगुळ्यासाठी या भागात यायचे. महाविद्यालयीन तरुणांचाही त्यात भरणा असायचा. बंदीमुळे अनेकांनी ऑर्केस्ट्राच्या नावाखाली बार सुरू ठेवले होते. पण त्यात पूर्वीसारखी मजा नव्हती. अनेकांनी छुप्या पद्धतीने बार सुरू ठेवले होते. पण पोलिसांच्या ससेमिऱ्यामुळे त्यावर कारवाईची दहशत असायची. नवीन बारबालाही येत नव्हत्या आणि ज्यांच्यामुळे हे डान्सबार ओळखले जायचे त्या बारबालाही निघून घेल्या होत्या. या निर्णयामुळे या भागाला पूर्वीसारखे ‘वैभव’ प्राप्त होईल आणि आर्थिक फटक्यातून सावरता येईल, असे येथील बार मालकाने सांगितले. नालासोपाऱ्याच्या नगीनदासपाडा, संतोष भुवन, भाईंदरच्या साईबाबा नगर या परिसरात या बार बाला रहायच्या. रात्री शेवटची लोकल तर बारबालांनी गच्च भरलेली असायची.
 पिक अप पॉइंट
ज्याप्रमाणे या पट्टयात डान्स बार होते तशी लॉजही होती. मीरा-भाईंदर शहर कुठलेही पर्यटन स्थळ नसतानाही या ठिकाणी मोठय़ा संख्येने लॉज आहेत. कारण इकडचे डान्स बार हे पिक-अप पॉइंट बनले होते. म्हणजे डान्स बारमध्ये जायचे. मुली पसंत करायच्या आणि बारच्या ठरलेल्या लॉजमध्ये त्यांना घेऊन जायचे. प्रत्येक डान्स बारचे एक लॉज ठरलेले असायचे आणि जवळपास प्रत्येक डान्सबारने शेजारीच लॉजची व्यवस्था करून ठेवली होती. अर्थात पोलिसांना मोठी बिदागी देऊन हे व्यवहार सुरू असायचे. त्यामुळेच काशीमीरा आणि मीरा रोड पोलीस ठाण्यात पोस्टिंगसाठी मोठा आर्थिक व्यवहार व्हायचा. डान्सबार बाहेरून जरी साधे दिसत असले तरी आतमधील आलिशान सजावट आणि गुप्त दरवाजे बनवून बारमालकानी सर्वप्रकारची सोय करून दिली होती.

Story img Loader