शहरातील वाहतुकीची कोंडी लक्षात घेता महानगर पालिकेने ऐतिहासिक जटपुरा गेटची भिंत सतरा फुटापयर्ंत तोडण्याचा प्रस्ताव औरंगाबाद पुरातत्व खात्याकडे आणि या कार्यालयाने हा प्रस्ताव दिल्ली येथील पुरातत्व खात्याकडे पाठविला आहे. दरम्यान, आयुक्तांच्या विशेष अभिप्रायासाठी दिल्ली कार्यालयाने पुन्हा हा प्रस्ताव औरंगाबादला पाठविल्याने वाहतुकीच्या कोंडीवर लवकरच तोडगा निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
 गोंडकालीन चंद्रपूर शहराच्या चारही बाजूने ऐतिहासिक किल्ल्याची भिंत अर्थात परकोट आहे. या शहरात प्रवेश करण्यासाठी जटपुरा, पठाणपुरा, बिनबा व अंचलेश्वर, असे चार मुख्य प्रवेशव्दार व आठ छोटय़ा खिडक्या आहेत. गोंडकाळात पठाणपुरा गेट शहराचे मुख्य प्रवेशव्दार होते, मात्र आज परिस्थिती पूर्णत: बदलली असून जटपुरा गेट मुख्य प्रवेशव्दार झाले असून तेथेच वाहतुकीची कोंडी होते. त्यामुळे लोकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. येथे सकाळी सहा वाजतापासून तर रात्री उशिरापयर्ंत अक्षरश: ट्राफीक जाम होते. खासगी ट्रॅव्हल्सपासून तर एस.टी. बसेस, स्कुल बसेस, ट्रक्स, दुचाकी व चारचाकी वाहनांची लांबच लांब रांग लागलेली असते. त्यातही दुचाकी वाहनांची संख्या अधिक असते. कार्यालयीन वेळ म्हणजे सकाळी ९.३० ते १२ या वेळेत तर जटपुरा गेटमधून निघण्यासाठी कमीत कमी अर्धा ते एक तासाचा कालावधी लागतो. अशा परिस्थितीत वाहनांच्या गर्दीत रुग्णवाहिका अडकली तर मोठीच अडचण निर्माण होते.
ही वाहतुकीची कोंडी आज सर्वात मोठी समस्या आहे. ती निकाली निघावी म्हणून आजवर बरेच प्रस्ताव समोर आले. त्यातील काही प्रस्तावांवर गांभीर्याने विचार झाला, मात्र तरीही कायम तोडगा अजूनही निघालेला नाही. महानगरपालिकेचे नव्याने रुजू झालेले आयुक्त प्रकाश बोखड यांनी ही समस्या अतिशय गांभीर्याने घेतली आहे. यावर उपाय शोधतांना आयुक्तांनी तत्कालीन जिल्हाधिकारी संजीव जयस्वाल यांनी २०१० मध्ये औरंगाबाद पुरातत्व खात्याला पाठविलेला प्रस्तावाची फाईल आता नव्याने पाठवली आहे. संजीव जयस्वाल यांनी ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी जटपुरा गेटची भिंत सतरा फूट तोडण्याचा प्रस्ताव औरंगाबाद पुरातत्व खात्याकडे पाठविलेला होता. या कार्यालयाने हा प्रस्ताव दिल्ली पुरातत्व कार्यालयात पाठविला होता, मात्र तेथे त्याचा पाठपुरावा झाला नाही. त्यामुळे हा प्रस्ताव कुठल्याही शेऱ्याशिवाय परत आला. आता दोन वर्षांत वाहतुकीची समस्या अधिकच जटील झाली आहे. याच कालावधीत जयस्वाल यांचे सहकारी म्हणून काम करणारे बोखड यांनी येथे आयुक्त म्हणून रुजू झाले, तर जयस्वाल औरंगाबाद येथे विभागीय आयुक्त आहेत. नेमका हाच धागा पकडून आयुक्त प्रकाश बोखड यांनी जिल्हाधिकारी विजय वाघमारे, खासदार हंसराज अहीर यांना ही बाब निदर्शनास आणून दिली. यानंतर त्यांनी जुन्या प्रस्तावातील त्रुटी कमी करून जिल्हाधिकाऱ्यांच्या मदतीने हा प्रस्ताव पुन्हा औरंगाबाद कार्यालयाला पाठविला.
विभागीय आयुक्त जयस्वाल यांना चंद्रपूरातील वाहतुकीच्या समस्येची माहिती असत्याने त्यांनी स्वत: लक्ष घालून हाच प्रस्ताव दिल्ली येथे पुरातत्व कार्यालयाला पाठविला. दिल्लीत खासदार हंसराज अहीर यांनी वजन खर्ची केले. त्याचा परिणाम दिल्ली कार्यालयाने अवघ्या महिन्याभरात ही फाईल ७ नोव्हेंबर रोजी औरंगाबाद पुरातत्व खात्याकडे विशेष अभिप्रायसाठी पाठवली आहे. औरंगाबाद कार्यालयातून हा विशेष अभिप्राय देण्यात आल्यानंतर दिल्ली येथील पुरातत्व खात्याचे कार्यालय यासंदर्भात योग्य तो निर्णय घेणार आहे. या सर्व घडामोडी लक्षात घेता वाहतुकीच्या कोंडीवर लवकरच तोडगा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्हाधिकारी विजय वाघमारे, आयुक्त प्रकाश बोखड व खासदार हंसराज अहीर यांच्या पुढाकारातून लवकरच या समस्येवर तोडगा निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यासंदर्भात आयुक्त प्रकाश बोखड यांना विचारणा केली असता त्यांनी सध्या फाईल औरंगाबाद कार्यालयात विशेष अभिप्रायासाठी आलेली असल्याची माहिती लोकसत्ताशी बोलतांना दिली.     

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा