गेले काही दिवस वाढत चाललेल्या तापमानाने गुरुवारी कहर केला. परभणी शहरात ४३.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. वाढत्या उकाडय़ामुळे लोक हैराण झाले आहेत. सेलू तालुक्यातील गुगळी धामणगाव येथे १३ शेतकऱ्यांच्या कडब्याच्या गंजीला आग लागून तब्बल ३५ हजार कडबा जळून खाक झाला. सायंकाळपर्यंत ही आग विझविण्याचे प्रयत्न सुरू होते.
सेलू तालुक्यातील गुगळी धामणगाव येथे रस्त्यालगत असलेल्या कडब्याच्या गंजींना आग लागून ३५ हजार गंजी जळून खाक झाल्या. दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली. घटना घडल्यानंतर लगेच अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. पाथरी, जिंतूर, परभणी येथून अग्निशमन दल आल्याने आग आटोक्यात आली. १३ शेतकऱ्यांच्या कडब्याच्या गंजी जळाल्याने मोठे नुकसान झाले. शॉटसर्किटने ही आग लागली.
कडब्याच्या गंजीच्या पाठीमागून विजेचा पुरवठा होतो. विजेचे खांबही गंजीलगतच आहेत. राधाकिशन जगदाळे, सुदाम मातने, साहेबराव जाधव, कचरू कदम, सुशीलकुमार कुलकर्णी, रामभाऊ खरात, तुकाराम महाजन, महादेव कसपटे, लक्ष्मण शाळीग्राम, गणेश मांडगे, दत्तराव राऊत, सुरेश भागवत व सखाराम मोहते असा ३५ हजारांहून अधिक कडबा जळाला.
कडाकाच्या उन्हासोबत पाणीटंचाईचेही चटके जाणवत असून, जिल्ह्यात बहुतेक ठिकाणी पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. त्यातच आता आगीच्या घटना घडू लागल्या आहेत. झोपडय़ा, कडब्याच्या गंजींना आगी लागत आहेत.