समाजातील असामंजस्याचा अभाव वाढत्या कलहास कारणीभूत ठरत आहे. स्वत:च्या रागाची वसुली करण्यासाठी न्यायालयात येणाऱ्यांची संख्या वाढते आहे. न्यायालयापुढे हक्क सांगणारे कर्तव्याबद्दल कधीच बोलत नाहीत, समाजाने कर्तव्याची कास धरल्यास हक्क सांगण्याची गरज भासणार नाही, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए. एच. जोशी यांनी केले.
श्री शिवशंभो प्रतिष्ठान व आष्टी तालुका मित्रमंडळ यांच्या वतीने दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांचे वितरण आज करण्यात आले, त्या वेळी अध्यक्षपदावरून न्या. जोशी बोलत होते. समाजात संस्काराचे संचित जतन करून वाटचाल करणाऱ्यांची दखल प्रतिष्ठानने घेतली याचा व पुरस्कारार्थीच्या कार्याचाही त्यांनी गौरव केला.
अभिनेते मिलिंद शिंदे यांनी सामाजिक काम करताना येणारे अडथळेच कार्यकर्त्यांची हिंमत वाढवतात, अशा पुरस्काराच्या उपक्रमातून समाज सुदृढ होण्यास मदतच होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. मुंबई दूरदर्शनचे निर्माते राम खाकाळ, डॉ. प्रदीप तुपेरे, बाळासाहेब पवार आदींची भाषणे झाली. प्रतिष्ठानचे अध्यक्ष अ‍ॅड. शिवाजी कराळे यांनी प्रास्तविक केले.
विविध पुरस्कारर्थी असे-ज्ञानेश्वर काळे, डॉ. हेमांगी पोतनीस, डॉ. शारदा महांडुळे, आनंद गायकवाड (समाजरत्न), मिलिंद चवंडके, नंदकुमार सातपुते, सूर्यकांत नेटके, दिगंबर बोडखे (पत्ररत्न), प्रा. सोपान निंभोरे, गीता खेडकर, अलका दरेकर, अमोल बागूल, प्रकाश नांगरे, अंबादास कर्डिले, आशा पोकळे (शिक्षकरत्न), सतीश शिंगटे, हमीद सय्यद, अपर्णा कुलकर्णी (कलारत्न) व स्व. मैनाबाई पवार स्मृत्यर्थ आदर्श माता पुरस्कार बेबीताई गायकवाड यांना प्रदान करण्यात आला. विजय आमटे व बागूल यांनी सूत्रसंचालन केले, डॉ. बाळासाहेब पवार यांनी आभार मानले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा