प्रेमसंबंधातून दिवस गेले. मुलगी ‘कुमारी माता’ बनली. परंतु ती अल्पवयीन असल्याने प्रियकरावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला. दरम्यानच्या काळात दोन्ही घरच्या ज्येष्ठांनी या दोघांचा विवाह करून देण्याचे ठरविले नि विवाह करून तशी कागदपत्रे न्यायालयात दाखल करण्याच्या अटीवर शुक्रवारी न्यायालयाने प्रियकराला जामीनही मंजूर केला. आता तब्बल ११ महिन्यांची कच्ची कैद भोगल्यानंतर ११ महिन्यांच्या मुलीच्या उपस्थितीत हे प्रियकर-प्रेयसी विवाहबंधनाने एकत्र येणार आहेत.
जिल्ह्य़ातील कोठरबन (तालुका वडवणी) येथील विलास मुंडे (वय २२) या तरुणाचे गावातीलच एका मुलीवर प्रेम बसले. त्यावेळी ती अल्पवयीन होती. प्रेमसंबंधातून ती गरोदर राहिली व गेल्या ३० डिसेंबरला तिला मुलगी झाली. या प्रकारानंतर गावात खळबळ उडाली. सुरुवातीला विलासने या प्रकारात मौन धरल्याने वडवणी पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल झाला. विलासच्या घरच्यांचा आधी ‘त्या’ मुलीला स्वीकारण्यास विरोध होता. त्यामुळे गुन्हा दाखल झाल्यानंतर विलासला आधी पोलीस कोठडी व नंतर न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले.
परंतु हा प्रकार घडूनही दोघांच्या प्रेमात कसलाही फरक पडला नव्हता. तिच्याशीच विवाह करण्याची तयारी विलासने दाखवली. मानवी हक्कचे अॅड. एकनाथ आवाड, मनीषा तोकले, अशोक तांगडे यांनी दोन्ही घरच्या लोकांची समजूत काढली. दोन्ही कुटुंबांनी विलास व त्याच्या प्रेयसीचा विवाह करून देण्याचा निर्णय घेतला. दरम्यानच्या काळात ३० डिसेंबरला जन्मलेल्या मुलीचे सावित्रीबाई फुले जयंतीदिवशी बारसे करण्यात आले. तिचे नाव ‘मैत्री’ ठेवण्यात आले. तेव्हापासून मैत्री व तिची आई बीडच्या अल्पमुदत निवासगृहात राहात आहेत.
दरम्यानच्या काळात दोघांचीही विवाहाला तयारी असल्याची माहिती न्यायालयाला देण्यात आली. माजलगाव सत्र न्यायालयाने शुक्रवारी विलासची जामिनावर सुटका केली. त्याला पुढील १५ दिवसांत विवाहाची प्रक्रिया पूर्ण करून न्यायालयात कागदपत्रे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आता अल्पमुदत निवासगृहात या विवाहासंदर्भात पुढील निर्णय घेण्यासाठी ११ डिसेंबरला बैठक होत असून या गृहसोहळ्यासाठी जिल्ह्य़ातील पोलीस, न्याय, महसूल विभागातील वरिष्ठ अधिकारी, सामाजिक कार्यकर्त्यांना बोलावण्याचे नियोजन सुरू असल्याची माहिती अल्पमुदती निवासगृहाच्या सल्लागार समिती सदस्या मनीषा तोकले यांनी दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा